दिव्यांग रूपाली... अपंग यंत्रणा अन् निराधार जगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:03 AM2020-12-05T05:03:46+5:302020-12-05T05:03:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : जन्मत:च नशिबाने टाकलेले उलटे फासे तिच्या आयुष्याच्या प्रवासात कधी सुलटे झालेच नाहीत. तिच्या शारीरिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : जन्मत:च नशिबाने टाकलेले उलटे फासे तिच्या आयुष्याच्या प्रवासात कधी सुलटे झालेच नाहीत. तिच्या शारीरिक दिव्यांगाला पदोपदी अडचणींच्या काटेरी मार्गावरुन चालावे लागले. ७६ टक्के अपंगत्व असतानाही अधू असलेल्या शासकीय यंत्रणेमुळे आजवर तिला दमडीचीही शासकीय मदत मिळू शकली नाही.
पाडळी (ता. शिराळा) येथील २७ वर्षीय दिव्यांग व मतिमंद असलेली रुपाली भगवान सोळसे जन्मत:च सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त आहे. उंची फक्त दोन फूट आहे. काेणतेही आधारकार्ड काढताना डाेळ्यांचे फाेटाे घेतले जातात. पण ७६ टक्के अपंग असलेल्या रुपालीच्या डोळ्याचे फोटो घेताना तिचे डोळे फिरतात. त्यामुळे आधारकार्ड निघत नाही. आधारकार्ड मिळाले नाही, त्यामुळे शासनाच्या कोणत्याही सवलतीचा फायदा मिळत नाही. मतदार यादीत नाव आहे, मात्र कोणतेही ओळखपत्र नसल्याने तिला मतदान करून दिले जात नाही.
साेळशे परिवाराचे मूळ गाव मसूद माले (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे असून भगवान सोळशे हे ४५ वर्षांपासून मामाच्या गावी म्हणजे पाडळी येथे आश्रयास आहेत. भगवान व सविता सोळशे यांना तीन मुली. यातील उज्ज्वला व दीपाली या दोन मुलींचे विवाह झाले आहेत. तिसरी मुलगी रूपाली. घरची गरिबी आणि त्यातच जन्मत:च सेरेब्रल पाल्सी व मतिमंद या आजाराने ग्रस्त असलेल्या रूपालीच्या जन्माने कुटुंबाला मानसिक धक्काच बसला. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असतानाही मोलमजुरी करत या दिव्यांग मुलीस जिद्दीने सांभाळायचे काम हे कुटुंब नेटाने करत आहे. दिव्यांगांसाठी शासनाच्या असंख्य योजना असताना, केवळ आधारकार्ड नसल्याने रूपाली या योजनांपासून वंचित आहे.
चाैकट
उपचारांना प्रतिसादच नाही
दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असूनही या मुलीला धान्य मिळत नाही. ही मुलगी रांगते, तिला दररोज हातात एक रुपयांचे नाणे द्यायलाच लागते. परिस्थिती नसतानाही आतापर्यंत ५ ते ६ लाख रुपये उपचारासाठी खर्च केले आहेत.