पोलिसांची दिवाळी यंदा बंदोबस्तातच, निवडणूक निकालानंतर कुटुंबासमवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 06:58 PM2024-10-22T18:58:57+5:302024-10-22T18:59:27+5:30
रजा, सुट्याही रद्द; जवळपास सहा हजार कर्मचारी निवडणुकीत व्यस्त
सांगली : गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर यंदाची पोलिसांची दिवाळी निवडणुकीच्या बंदोबस्तात आणि धावपळीत जाणार आहे. पोलिसांच्या रजा, सुट्या २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना कुटुंब प्रमुखाशिवाय सण साजरा करवा लागणार असे चित्र दिसते.
लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन महिने पोलिस बंदोबस्तात व्यस्त होते. त्यानंतर थोड्या दिवसाची विश्रांती मिळाली. पुन्हा गणेशोत्सवात पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर नवरात्रोत्सवाचा बंदोबस्तही झाला. विधानसभा निवडणुकीचा धमाका ऐन दिवाळीत सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार यंदाच्या दिवाळीतच निवडणुकीची धामधूम असणार आहे.
निवडणूक म्हटली की उमेदवारांच्या अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत पोलिसांना दक्ष राहावे लागते. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना रात्रंदिवस सज्ज राहावे लागते. यंदा तर दिवाळी सणाचा बंदोबस्त आणि निवडणूक दोन्हीकडे पोलिस यंत्रणेला लक्ष द्यावे लागणार आहे. निवडणुका म्हटले की, पोलिसांच्या रजा आणि सुट्या बंद होतात. त्यानुसार यंदाही पोलिसांना सणासुदीच्या काळात कुटुंबीयांकडे लक्ष देता येणार नाही.
पोलिस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणासाठीच्या रजा घेता येणार आहेत. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात जवळपास ६ हजारहून अधिक पोलिस, होमगार्ड, राज्य राखीव दलाचे पोलिस यांचा बंदोबस्त राहणार आहे.
पोलिसांना अनेक सणासुदीच्या काळात रजा, सुट्या मिळत नाहीत हे चित्र सगळीकडेच दिसते. परंतू यंदा निवडणूक आणि दिवाळीसारखा मोठा सण एकाचवेळी आला आहे. त्यामुळे पोलिसांची दिवाळी यंदा बंदोबस्तातच जाणार असल्याचे चित्र दिसून येते.
सहा हजारहून अधिक बंदोबस्त
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघात पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. अधीक्षक, अपर अधीक्षक, उपअधीक्षक ७, निरीक्षक २७, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक १५७, पोलिस कर्मचारी ३९५३ आणि होमगार्ड १९९५ असा जवळपास सहा हजारहून अधिक कर्मचारी, अधिकारी यांचा बंदोबस्त सज्ज असणार आहे.
निकालानंतर कुटुंबासमवेत
जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी दूरवरून ही येतात. त्यामुळे अनेकांना घरदार सोडून कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे अनेकांना निकालानंतरच कुटुंबीयांची भेट घेता येणार आहे.