अखेर दिवाळी स्पेशल गाड्यांना सांगली स्थानकावर थांबा मंजूर, बिकानेर-बेंगलोर-बिकानेर एक्स्प्रेस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 01:10 PM2023-11-21T13:10:58+5:302023-11-21T13:49:36+5:30

सांगलीपासून बंगळुरूपर्यंत नऊ थांबे

Diwali Special Trains Stopped at Sangli Station | अखेर दिवाळी स्पेशल गाड्यांना सांगली स्थानकावर थांबा मंजूर, बिकानेर-बेंगलोर-बिकानेर एक्स्प्रेस धावणार

अखेर दिवाळी स्पेशल गाड्यांना सांगली स्थानकावर थांबा मंजूर, बिकानेर-बेंगलोर-बिकानेर एक्स्प्रेस धावणार

अविनाश कोळी

सांगली : पुण्याखालोखाल सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगलीरेल्वे स्थानकाला आता दिवाळी विशेष रेल्वे गाड्यांचे थांबे मंजूर करण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. येत्या २६ व २७ नोव्हेंबरला बिकानेर-बेंगलोर ही गाडी सांगली स्थानकावरील प्रवाशांना घेऊन धावणार आहे. परतीच्या प्रवासातही याच गाड्यांना दोन थांबे मंजूर झाले आहेत. आणखी काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना सांगलीत थांबा मिळण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रवासी संघटनांनीही त्याबाबत आग्रह धरला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिवाळीच्या काळात अनेक विशेष गाड्या सुरू केल्या. डिसेंबरपर्यंत या विशेष गाड्या धावणार आहेत. दिवाळीच्या काळात प्रवाशांना तातडीने कामाच्या ठिकाणी किंवा गावाकडे जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध व्हाव्यात म्हणून दरवर्षी या गाड्या जाहीर केल्या जातात. यंदाच्या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये सांगलीला एकाही गाडीचा थांबा नव्हता.

त्यामुळे प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त करीत तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने बिकानेर-बेंगलोर(गाडी क्र. ०६५६८ व गाडी क्र. ०६५६६) या दोन गाड्यांना सांगलीचा थांबा दिला आहे. बेंगलोर-बिकानेर (गाडी क्र. ०६५६५ व गाडी क्र. ०६५६७) या दोन गाड्यादेखील सांगली स्टेशनवर थांबतील. यामुळे राजस्थान, गुजरात, मुंबई, कर्नाटक, बेंगलोर येथून सांगलीला येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची सोय होईल.

बिकानेर-बंगळुरू गाडी अशी धावणार

रविवार, २६ नोव्हेंबर रोजी गाडी क्र. ०६५६६ व २७ नोव्हेंबरला गाडी क्र. ०६५६८ रात्री ११:५२ वाजता सांगली स्टेशनहून सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वातीन वाजता ती बंगळुरूला पोहोचेल.

सांगलीपासून बंगळुरूपर्यंत नऊ थांबे

सांगली स्थानकातून ही गाडी सुटल्यानंतर घटप्रभा, बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगिरी, बिरूर, आर्सिकेरी, तुमकूर या नऊ स्थानकावर थांबून ही गाडी बंगळुरूला पोहोचेल.

बंगळुरू-बिकानेर अशी धावणार

२७ नोव्हेंबरला गाडी क्र. ०६५६५ व २८ नोव्हेंबरला गाडी क्र. ०६५६७ बंगळुरूहून सकाळी साडेसातला सुटून रात्री ९:५३ वाजता सांगली स्टेशनवर पोहोचेल. त्यानंतर सांगलीहून दोन मिनिटात ती बिकानेरच्या दिशेने धावेल.

सांगलीपासून बिकानेरपर्यंत २१ थांबे

सांगली स्थानकातून ही गाडी सुटल्यानंतर सातारा, पुणे, कल्याण, वसई रोड, सुरत, भरुच, वडोदरा, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवारा, फालना, मारवाड, पाली मारवार, लुनी, नागौर, नोखा या २१ स्थानकावर थांबून ही गाडी बिकानेरला पोहोचेल.

मोठ्या प्रमाणावर तिकिटे उपलब्ध

बिकानेर-बंगळुरू गाडीला सोमवारी सकाळपर्यंत सर्व क्लासची एकूण ६८२ तिकिटे सांगली स्टेशनपासून उपलब्ध होती.


बिकानेर-बंगळुरू-बिकानेर विशेष रेल्वे गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा मिळाल्याने लोकांची सोय होणार आहे. बंगळुरूकडे जाणाऱ्या दोन्ही रेल्वे गाड्यांचे बुकिंग सांगली रेल्वे स्थानकावरून सुरू आहे. बिकानेरला जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंगही सांगली स्थानकावरून लवकर सुरू व्हावे, ही अपेक्षा आहे. मध्य रेल्वे मुंबई व पुणे विभागातील अधिकाऱ्यांना या निर्णयाबाबत आम्ही धन्यवाद देतो. - रोहित गोडबोले, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

Web Title: Diwali Special Trains Stopped at Sangli Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.