आली माझ्या घरी ही दिवाळी...
By admin | Published: November 9, 2015 10:45 PM2015-11-09T22:45:09+5:302015-11-09T23:23:14+5:30
जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण : खरेदीसाठी सांगलीच्या बाजारपेठांमध्ये दिवसभर गर्दी; मोठी उलाढाल
सांगली : ‘प्रकाश आणि मांगल्याचा उत्सव’ म्हणून ओळख असलेल्या दिवाळीची आज, मंगळवारपासून खऱ्याअर्थाने सुरुवात होत असून, सोमवारीही बाजारपेठेतील उत्साह कायम होता. दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, लक्ष्मीपूजेसाठी लागणाऱ्या फळांच्या आणि फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत होती. तसेच ज्या चाकरमान्यांचा पगार, बोनस झाला आहे, त्यांच्या दिवाळीस सोमवारपासूनच सुरुवात झाली. दरम्यान, व्यापारी वर्गाकडून रोजमेळाच्या हिशेबाच्या वह्या खरेदीसाठीही बाजारात गर्दी होती. मंगळवारी नरकचतुर्दशीच्या निमित्ताने या दिवाळीतील पहिले अभ्यंगस्नान होत आहे.
दिवाळीची खरी सुरुवात नरकचतुर्दशीपासून होते. मात्र बाजारपेठेत फेरफटका मारला असता, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली खरेदीसाठीची गर्दी आजही कायम होती. कपड्यांच्या खरेदीबरोबरच पाडव्यादिवशीची वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी निश्चित करण्याकडे ग्राहकांचा ओढा होता. सोमवारी धनत्रयोदशीला व्यापारी वर्गाकडून वर्षभरासाठी लागणाऱ्या हिशेबाच्या वह्या खरेदीसाठी शहरातील गणपती पेठ व कापड पेठेतील वही विक्रेत्यांकडे गर्दी दिसून येत होती. यंदा वह्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असली तरी, त्याचा कोणताही परिणाम खरेदीवर दिसून आला नाही. पारंपरिक बायडिंगच्या वह्या खरेदीसाठी व्यापारीवर्गाने प्राधान्य दिले.
वसुबारसपासून दिवाळीस सुरुवात झाली असली तरी, दिवाळीचा खरा उत्साह हा मंगळवारपासूनच सुरु होणार आहे. शाळांसह शासकीय कार्यालयांना सुरु असलेल्या सलग सुट्ट्यांमुळे दिवाळीच्या आनंदात भर पडली आहे. नरकचतुर्दशीनंतर लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे सलग सण असल्याने, खरेदीसाठी आज एकच दिवस होता. त्यामुळे बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. मंगळवारच्या पहिल्या अभ्यंगस्नानासाठी सुगंधी उटणे, साबण आणि सुगंधी तेलांची चांगली विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
नरकचतुर्दशीला व लक्ष्मीपूजनाला फुलांचे आणि फळांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने पूजेसाठी फळांच्या खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांची आवक सोमवारपासून सुरू झाली असली तरी, मागणी कमी होती. मंगळवार सायंकाळपासून फुलांना मागणी वाढणार आहे.
फटाक्यांच्या खरेदीसाठीही गर्दी होत असून यावेळी प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच फटाक्यांची विक्री करावयाची असल्याने, ग्राहकांना फटाके स्टॉल शोधताना कसरत करावी लागत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला गावी जाण्यासाठी बसस्थानकावर गर्दी होती. गर्दी वाढल्याने गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. एसटीतर्फे गर्दीनुसार जादा बसेसची सोय केल्याने प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळाला. साऱ्या सणांत ‘लय भारी’ सण असणाऱ्या दिवाळीची तयारी पूर्ण झाल्याने दीपोत्सवास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. (प्रतिनिधी)
प्रदूषणमुक्त दिवाळी : सामाजिक संस्थांचा जागर
एकीकडे दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, मंगळवारपासून फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीने आसमंत उजळून निघणार असला तरी, प्रदूषणाची चिंता ही आहेच. आतषबाजीनंतर निर्माण होणारा फटाक्यांचा कचराही वाढत असल्याने, शहरातील काही सामाजिक संस्थांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घेत प्रबोधन चालविले आहे.
फटाके फोडताना काळजी ही हवीच...
दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करताना आवश्यक ती काळजी घ्यावी. आतषबाजी करीत असताना लहान मुलांबरोबर घरातील ज्येष्ठांनी थांबणे गरजेचे आहे. लहान मुलांना फटाके हाताळण्यास देऊ नयेत. मोठ्या आवाजाचे अथवा धोकादायक फटाके फोडणे टाळण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
दिवाळी शुभेच्छांनी मोबाईल फुल्ल
काही वर्षांपर्यंत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटकार्डाचा सर्रास वापर होत असे. विविध संदेश असलेल्या भेटकार्डांना मागणीही होती. मात्र आजच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात शुभेच्छा देण्यासाठी व्हॉटस्-अॅपचा वापर जोरात सुरू आहे. त्यामुळेच अनेकांनी व्हॉटस्-अॅपद्वारे शुभेच्छा देण्यासच प्राधान्य दिले आहे.
आज नरकचतुर्दशी
नरकचतुर्दशीदिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, अशी अख्यायिका आहे. नरकासूर वधाच्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.