अनिकेत कोथळेचा डीएनए अहवाल न्यायालयात सादर, उलट तपासादरम्यान शाब्दिक खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 12:33 PM2023-06-13T12:33:31+5:302023-06-13T12:33:54+5:30
खुनाच्या कालावधीतील आरोपींचे मोबाइल संभाषण व सर्व तांत्रिक तपशीलही सादर
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी तपास अधिकारी आणि तत्कालीन सीआयडीचे पोलिस उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी कोथळेचा डीएनए अहवाल सोमवारी न्यायालयासमोर सादर केला. दरम्यान, बचाव पक्षाचे वकील विकास पाटील तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्यात उलट तपासादरम्यान जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायालयात साेमवारी खटल्याचे कामकाज झाले. निकम यांनी कुलकर्णी यांचा सरतपास नोंदवला. त्यामध्ये त्यांनी अनिकेतच्या आई-वडिलांच्या परवानगीने डीएनए चाचणीसाठी घेतलेल्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल सादर केला. खुनात सहभागी असलेल्या आरोपींनी ज्या गाडीतून अनिकेतचा मृतदेह नेला, त्या मोटारीचे कोगनोळी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज सादर केले. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हीस्टो पॅथॉलॉजी (ऊती शास्त्र) त्याचप्रमाणे एनोटॉमी (शरीरशास्त्र) अहवालसुद्धा न्यायालयास सादर करण्यात आला.
कुलकर्णी यांनी नोंदवलेल्या जबाबांची माहिती न्यायालयास दिली. खुनाच्या कालावधीतील आरोपींचे मोबाइल संभाषण व सर्व तांत्रिक तपशीलही सादर केला. अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या आंबोली येथील घटनास्थळाचा नकाशा तसेच सांगली येथील घटनास्थळाचा नकाशा सादर केला. अनिकेत याच्या अस्थी न्यायवैद्यक परीक्षणानंतर पुढील धार्मिक विधीसाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्या. अनिकेतचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, त्या कारणाचा उल्लेख असलेला सविस्तर तपशीलाचा वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला.