आणखी सात जोडप्यांची ‘डीएनए’ तपासणी
By admin | Published: April 5, 2017 12:36 AM2017-04-05T00:36:34+5:302017-04-05T00:36:34+5:30
म्हैसाळ गर्भपात प्रकरण; अहवालाची प्रतीक्षा
सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्येच्या प्रकरणात मुलीचा गर्भ आहे म्हणून डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या आणखी सात जोडप्यांचे ‘डीएनए’ तपासणीसाठी पोलिसांनी नमुने घेतले आहेत. यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जोडप्यांचा समावेश आहे. यापूर्वीही सात जोडप्यांचा शोध घेऊन ‘डीएनए’ तपासणी केली आहे. पण अजूनही त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. आतापर्यंत १४ जोडपी शोधून काढण्यात यश आले आहे.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर खिद्रापुरेचे भ्रूणहत्येचे ‘रॅकेट’ उघडकीस आले होते. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळ येथे ओढ्यालगत पुरले होते. जेसीबीने खुदाई केल्यानंतर तब्बल १९ भ्रूण सापडले होते. या भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’साठी यापूर्वीच पाठविले आहेत. पण ज्या महिलांचे गर्भपात केले होते; त्यांचेच हे भ्रूण आहेत का, याचा तपास करणे महत्त्वाचे होते. यासाठी पोलिसांनी गर्भपात केलेल्या महिलांचा शोध सुरु ठेवला. गेल्या महिन्यात गर्भपात केलेल्या सात महिला व त्यांचे पती यांचा शोध घेतला होता. त्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी पाठविले आहेत. पण अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. पोलिसांच्या शोधमोहिमेत गर्भपात केलेल्या आणखी सात महिला व त्यांचे पती यांचा शोध घेण्यात यश आले आहे. यामध्ये मालगाव (ता. मिरज), मोरगाव (ता. कवठेमहांकाळ), शहापूर (ता. हातकणंगले), करवीर (जि. कोल्हापूर), तेरवाड, गौरवाड (ता. शिरोळ) व शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील जोडप्यांचा समावेश आहे. त्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी घेतले आहेत.
पोटात वाढत असलेला गर्भ मुलीचा असल्याचे गर्भलिंग निदान तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर, अनेक महिला पतीच्या मदतीने खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात करण्यास येत असत. आतापर्यंत खिद्रापुरेने अनेक गर्भपात केल्याची माहिती पुढे येत असल्याने, त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावा गोळा करण्यासाठी, गर्भपात केलेल्या महिलांचा व त्यांच्या पतींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु ठेवले होते. यामध्ये त्यांना यशही आले आहे. आतापर्यंत जोडप्यांना ‘डीएनए’ तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे. त्यांनीही गर्भपात केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. त्यांच्या नावाबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. (प्रतिनिधी)