नागपुरात बेमुदत उपोषण करू
By admin | Published: December 3, 2015 12:46 AM2015-12-03T00:46:27+5:302015-12-03T00:48:37+5:30
सुमनताई पाटील : ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी आठवड्याची मुदत
कवठेमहांकाळ : बळिराजा पाणी-पाणी म्हणून टाहो फोडत आहे. भाजप सरकार मात्र पाण्याचे राजकारण करीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी देण्याचे टाळत आहे. येत्या सात दिवसात म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी कवठेमहांकाळला दिले नाही, तर नागपूर विधान भवनासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा बुधवारी आमदार सुमनताई पाटील यांनी दिला.
आमदार पाटील चार दिवस मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणींची माहिती घेण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी कुकटोळी, म्हैसाळ (एम), सराटी, कोंगनोळी, रामपूरवाडी, करोली (टी), अग्रण धुळगाव या गावांचा दौरा केला. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी सांगितले, शेती पाण्याविना ओसाड बनत चालली आहे. हातातोंडाला आलेली पिके वाळू लागली आहेत. खरीप वाया गेला, आता रब्बीही वाया जाणार आहे. यासाठी काहीतरी करा. या प्रश्नावर त्यांनी नागपूर येथे उपोषण करण्याचा इशारा दिला. कवठेमहांकाळ हद्दीतून धुळगावकडे येणारा म्हैसाळ योजनेचा पोटकालवा पूर्ण झालेला नाही. त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी उपसरपंच अधिक जाधव यांनी केली.
आमदारांचे स्वागत धुळगावच्या सरपंच शारदा जगताप यांनी केले. सखाराम दुधाळ, अण्णासाहेब भोसले, बिरा कदम यांनीही तक्रारी मांडल्या. आमदारांसोबत विजय सगरे, सुरेशभाऊ पाटील, भाऊसाहेब पाटील, टी. व्ही. पाटील, मेघाताई झांबरे, सुरेखा कोळेकर, गजानन कोठावळे उपस्थित होते. (वार्ताहर)