इस्लामपुरातील स्मशानभूमीची जागा बदलू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:58+5:302021-05-20T04:27:58+5:30
इस्लामपूर : शहरातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे. या मृत्यू झालेल्या व्यक्तींचा अंत्यविधी कापूसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीत होत होता. या ...
इस्लामपूर : शहरातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे. या मृत्यू झालेल्या व्यक्तींचा अंत्यविधी कापूसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीत होत होता. या परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अंत्यविधीचे ठिकाण बदलून लगूनखड्डा या परिसरात नेण्याचा ठराव पालिकेने केला आहे. याला या परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून, याचे निवेदन मुख्याधिकारी अरविंद माळी यांना देऊन ही तक्रार पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, कापूसखेड रोडवर नगर परिषदेची सुसज्ज स्मशानभूमी आहे. तेथे गॅसवाहिनी आहे. या स्मशानभूमीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. गॅसवाहिनी व्यतिरिक्त आठ ते दहा मृतदेह दहन करण्याची सोय आहे. विद्युत गॅसवाहिनीमुळे प्रदूषण होत नाही, अशी व्यवस्था असताना मृतदेहाच्या अंत्यविधीची जागा बदलण्याचा घाट घातला जात आहे. या परिसरात बागायती शेती आहे. या ठिकाणी कचरा डेपो आहे. शेतकऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. याचा त्रासही शेतकऱ्यांना होणार आहे. तरी हा निर्णय बदलावा, अशी मागणी शेतकरी युवराज पाटील यांच्यासह या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.