आटपाडीत नाही प्यायला पाणी... आणि म्हणे दीड लाख रोपे लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:43 PM2019-07-09T23:43:14+5:302019-07-09T23:43:18+5:30
अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या आटपाडी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि ...
अविनाश बाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या आटपाडी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू आहेत, तिथे वनीकरण विभागाने रोपे विक्री करण्याचे दुकान थाटले आहे! विशेष म्हणजे येथे दीड लाख रोपे विक्री करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
आटपाडीत जानेवारीत १५ टन मक्याचे बियाणे चाºयासाठी वाटप करण्यात आले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता वनीकरण विभाग १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यात म्हणे दीड लाख रोपे लावणार आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे ३७ टॅँकर दररोज १०९ खेपा टाकून लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान कशी-बशी भागवत आहे. १४ गावे व २२८ वाड्या-वस्त्यांवरील ४९७२२ लोकसंख्या दररोज पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची वाट पाहत आहे. २७ छावण्यांमध्ये १८९१२ जनावरे जगण्यासाठी दाखल आहेत.
असे असतानाही तालुक्यात वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने कंबर कसली आहे. खासगी रोपवाटिकेत १५ ते २० रुपयांना मिळणारी रोपे ८ रुपयांना विक्री करून तालुक्यात काम सुरू आहे. दीड लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तहसील कार्यालयाच्या दारात मंडप ठोकून रोपे विक्रीचे दुकान नव्हे, तर स्टॉल सुरू केला आहे.
तालुक्यात पाऊसच नाही, तर लोकांना त्यांच्या शेतात किंवा शासकीय जागेत झाडे लावणे सध्या तरी कठीणच बनले आहे. दि. १ जुलैपासून आजपर्यंत तब्बल ६२ रोपांची विक्री झाली आहे! म्हणजे दररोज ७ ते ८ रोपे विकली जात आहेत. या गतीने रोपे विकली, तर दीड लाख रोपे विकायला १८७५० दिवस म्हणजे ६२५ महिने, म्हणजेच ५२ वर्षे लागतील!
वनीकरण नव्हे, पैशाचे कुरण!
आटपाडीत दोन वनीकरण विभाग कार्यरत आहेत. ते दरवर्षी लाखोच्या संख्येने कागदोपत्री वृक्ष लागवड करून उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात वाढलेली झाडे कुठेच दिसत नाहीत. ते केवळ भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. सध्या जांभूळ, आवळा, चिंच, सीताफळ, गुलमोहर, गूळभेंडी, शिसव, करंज, काशीद या झाडांची रोपे दिली जात आहेत. यापैकी अनेक वृक्षांची लागवड परंपरेनुसार केली जात नाही.