सरकारवरील राग व्यक्त करण्याची संधी सोडू नका
By admin | Published: January 6, 2017 12:19 AM2017-01-06T00:19:33+5:302017-01-06T00:19:33+5:30
धनंजय मुंडे : कामेरीत विविध विकास कामांचे उद्घाटन
कामेरी : नोटाबंदी व शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा कवडीमोल दर याबाबत केंद्र व राज्य सरकारवरील राग व्यक्त करण्याची चांगली संधी, येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. सरकारचा निषेध नोंदवत राष्ट्रवादीला मतदान करा, असे आवाहन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी येथे केले.
कामेरी (ता. वाळवा) येथे कामेरी ग्रामसचिवालय, जलशुध्दीकरण केंद्र, जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे भूमिपूजन आणि पाणीपुरवठा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. जयंत पाटील होते.
मुंडे म्हणाले की, ऊस दरासाठी यापूर्वी बारामतीला जाऊन आंदोलन करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी नाही, तर स्वत:च्या स्वार्थासाठी आंदोलने केली. एक खासदार व दुसरा मंत्री झाला. नंतर त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ केला आहे. यापुढील काळात त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला यापैकी कशालाही दर नाही. त्यांना साथ देणाऱ्या शेतकरी संघटना गप्प आहेत. मंत्रिमंडळात एक-दोन मंत्र्यांचा अपवाद वगळता शेतकऱ्यांची बाजू घेणारा कोणी नाही. भ्रष्टाचार व काळा पैसा शोधण्यासाठी नोटाबंदी केली, असे सांगणारे भाजपवाले आता त्यावर काहीच बोलत नाहीत. आता भारत कॅशलेस करायचा आहे, असे म्हणतात. केंद्र व राज्य सरकारवरील राग व्यक्त करण्याची चांगली संधी निवडणुकीच्या माध्यमातून आता आली आहे.
यावेळी जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील, भाऊसाहेब पाटील, वाळवा पं. स. सभापती रवींद्र बर्डे, देवराज पाटील, नंदू पाटील, जगदीश पाटील, सुनील पाटील, छाया पाटील दिलीप पाटील उपस्थित होते. रणजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र पाटील व पोपट कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच अशोक कुंभार यांनी आभार मानले. (वार्ताहर)