चिमुकलीची आर्त हाक, शाळेला जाऊ दे न व! स्वप्नांना दाखल्याचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 02:34 PM2018-12-28T14:34:26+5:302018-12-28T14:35:44+5:30

कोवळ््या वयातच नियतीचे घाव झेलत तिने शिक्षणाच्या स्वप्नांना आपल्या हृदयात फुलविले. बालवाडीपर्यंतचा विनाअडथळ््यांचा प्रवास करून शाळेत जायची वेळ आली आणि संकटांच्या कठोर बेड्यांनी पुन्हा तिचे पाय बांधले. जन्मनोंदीचा गोंधळ आणि दाखल्याने फिरवलेली पाठ यामुळे डोळ््यातील स्वप्नांच्या जागी अश्रुंनी घर केले. संपूर्ण समाजालाच ती आता आर्त विनवणी करीत आहे, शाळेला जाऊ दे न व!

Do not let the school go to school! Problems obstructing dreams | चिमुकलीची आर्त हाक, शाळेला जाऊ दे न व! स्वप्नांना दाखल्याचा अडथळा

चिमुकलीची आर्त हाक, शाळेला जाऊ दे न व! स्वप्नांना दाखल्याचा अडथळा

Next
ठळक मुद्देचिमुकलीची आर्त हाक, शाळेला जाऊ दे न व! स्वप्नांना दाखल्याचा अडथळा नियतीच्या कठोर बेड्यांनी तिला अडकविले

अविनाश कोळी

सांगली : कोवळ््या वयातच नियतीचे घाव झेलत तिने शिक्षणाच्या स्वप्नांना आपल्या हृदयात फुलविले. बालवाडीपर्यंतचा विनाअडथळ््यांचा प्रवास करून शाळेत जायची वेळ आली आणि संकटांच्या कठोर बेड्यांनी पुन्हा तिचे पाय बांधले. जन्मनोंदीचा गोंधळ आणि दाखल्याने फिरवलेली पाठ यामुळे डोळ््यातील स्वप्नांच्या जागी अश्रुंनी घर केले. संपूर्ण समाजालाच ती आता आर्त विनवणी करीत आहे, शाळेला जाऊ दे न व!

विसापूर (ता. तासगाव) येथील प्रज्ञा जगन्नाथ कांबळे या सहा वर्षीय बालिकेची ही कहाणी अनेकांच्या हृदयात कालवाकालव करणारी आहे. व्यसनांच्या आहारी गेलेला बाप संसाराच्या जबाबदाऱ्यांपासून कोसो दूर गेला आहे. तिच्या वयाच्या दुसऱ्या वर्षीच मातृछत्र हरपले. क्षयरोगाने तिच्या आईचे निधन झाले.

एक बहीण, दोन भावांसोबत प्रज्ञाचा सांभाळ तिची आजी अनुसया करू लागल्या होत्या. प्रज्ञाची मोठी बहीण स्नेहलचा वयाच्या चौदाव्या वर्षी मेंदूच्या पक्षाघाताने मृत्यू झाला. प्रज्ञा सर्वात लहान असून तिच्यापेक्षा दोन मोठे भाऊ आहेत. त्यातील एक सतरा वर्षाचा, तर दुसरा १४ वर्षाचा आहे. दोघांनीही परिस्थितीमुळे शिक्षण सोडून छोटी-मोठी कामे करून घराला हातभार लावण्याची धडपड सुरू केली, पण प्रज्ञाच्या मनात शिक्षणरुपी पंखाने आकाशात विहार करण्याच्या स्वप्नांनी घर केले.

बालवाडीपर्यंत तिच्या शिक्षणाला कोणताही अडथळा आला नाही. तिची हुशारी, शिक्षणाप्रती असलेली आस्था बालवाडी शिक्षिकेच्याही लक्षात आली. बालवाडीतले शिक्षण पूर्ण झाले आणि शाळेत जायची वेळ आली तेव्हा नियतीने तिला पुन्हा गाठले आणि तिच्या स्वप्नांना बेड्या घालण्यास सुरुवात केली.

शाळेत प्रवेश घेताना जन्माच्या दाखल्याची गरज असते, पण या कुटुंबाकडे तिच्या जन्माचा दाखलाच नव्हता. दाखल्याबाबतची सर्व माहिती तिच्या आईबरोबरच निघून गेली होती. प्रज्ञाचा जन्म मिरजेच्या शासकीय रुग्णालयात झाला होता. तिच्या आजीला तिच्या जन्माची तारीख माहित होती. तिने शासकीय रुग्णालय गाठले, पण त्या तारखेला तिच्या जन्माची तिथे नोंदच नव्हती.

महापालिकेच्या दप्तरीही तिच्या जन्माची नोंद आढळून आली नाही. तारखेचा गोंधळ नेमका शासकीय आहे की, तिच्या परिस्थितीचा, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नाही. तरीही शिक्षणाच्या वाटा एका कागदाच्या तुकड्याने अडविल्या, हे मात्र सत्य आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरू झालेली तिच्या शाळाप्रवेशाची धडपड आता सहावे वर्ष संपत असतानाही कायम आहे.


शासकीय कार्यालयांनी झिडकारले

मिरज शासकीय रुग्णालय तसेच महापालिकेच्या कार्यालयातही या चिमुकलीच्या आजीने जाऊन चौकशी केली, पण नियमावर आणि तारखेवर अडलेल्या शासकीय मानसिकतेने त्यांना झिडकारले. वारंवार हेलपाटे मारून, तिच्या वेदना ऐकूनही शासकीय भिंतींना दयेचा पाझर फुटला नाही. शासकीय रुग्णालयात जन्म झाला असतानाही तिथे नोंदीच सापडत नाहीत, हा कारभार संतापजनक आहे. नियतीने कठोर शिक्षा दिलेल्या या कुटुंबाच्या परिस्थितीचा विचार करून किमान मागच्या-पुढच्या महिन्यांच्या फायली चाळण्याचे कष्टही येथील कर्मचाºयांनी का घेतले नाहीत, असा प्रश्नही उपस्थित होतो.


प्रज्ञाची आई गेली, आता बापही कधीतरी दारु पिऊन निघून जाईल. तिच्या भावंडांचे शिक्षण परिस्थितीमुळे थांबले, पण प्रज्ञाचे शिक्षणाचे स्वप्न मला पुर्ण करायचे आहे. दाखल्यामुळे आलेल्या अडचणी वर्ष झाले तरी संपलेल्या नाहीत. मी अडाणी असले तरी मला तारखा माहित आहेत. तरीही कुणी दाखल देण्यासाठी मदत करीत नाही. मी अजून धडपड करेन आणि पोरीला शिकवेन.
- अनुसया विठ्ठल कांबळे,
प्रज्ञाची आजी (आईची आई), विसापूर, ता. तासगाव

Web Title: Do not let the school go to school! Problems obstructing dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.