सांगलीकरहो, लातूरचे पाणी बंद करू नका
By admin | Published: April 22, 2016 11:15 PM2016-04-22T23:15:22+5:302016-04-23T00:55:11+5:30
रावसाहेब दानवे : तासगावात शिवरायांच्या पुतळा चबुतऱ्याचे भूमिपूजन; ‘टेंभू’साठी निधी देणार
तासगाव : छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहिल्यावर त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण होते. त्यांच्या कामापासून प्रेरणा मिळते. पुतळा उभारण्याबाबत पूर्वीच्या शासनाचे जाचक नियम होते. मात्र आता प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा उभारला जात असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. सांगली जिल्ह्याने लातूरला पाणी देऊन पाण्याचे ओझे कमी केले. टेंभूच्या पाचव्या टप्प्यासाठी आणखी पैसे देऊ, मात्र लातूरचे पाणी बंद करू नका, असेही ते म्हणाले. येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळा चबुतऱ्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याहस्ते पुतळा चबुतऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले, शिवरायांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यांच्या कामाचे स्मरण होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात पुतळे उभारले जात आहेत. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अरबी समुद्रातदेखील महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळाचे सावट आहे. कमी पावसाच्या ठिकाणी दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्राकडूनही कधी नव्हे इतकी ३२०० कोटी रुपयांची मदत राज्याला देण्यात आली आहे. राज्यातील अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. ‘टेंभू’चा प्रकल्प पैशाअभावी थांबला आहे. त्यासाठी पैसे उपलब्ध करुन दिले. सांगली जिल्ह्याने लातूरला पाणी देऊन पाण्याचे ओझे कमी केले. रेल्वेमुळे मराठवाड्याला पाणी मिळाले. टेंभूच्या पाचव्या टप्प्यासाठी आणखी पैसे देऊ, मात्र लातूरचे पाणी बंद करू नका. भाजपच्या सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. ते कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन सांगायला हवेत.
खासदार पाटील म्हणाले की, शहरात महाराजांचा अश्वारुढ पुतळा असावा, अशी लोकांची अनेक वर्षापासून मागणी होत होती. हा पुतळा लवकरात लवकर उभारला जाईल. या पुतळ्यासाठी लोकवर्गणीही मिळणार असून, अशाच पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही उभारण्यात येईल.
नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. (वार्ताहर)