पाण्याचे नव्हे, आता हवेचे बिल पालिकेला द्यायचे का?
By admin | Published: December 15, 2014 10:55 PM2014-12-15T22:55:23+5:302014-12-16T00:17:44+5:30
नागरिकांचा सवाल : २४ तास योजनेच्या ठेकेदाराचे बिल अडविले
सांगली : महापालिकेच्या चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना भरमसाठ बिले आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाण्यासोबतच हवेचेही मीटर रिडिंंग होत असल्याने बिले वाढली असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. याबाबत पाणी मीटरची तपासणी करून रिडिंगबाबत खात्री झाल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
तत्कालीन विकास महाआघाडीने विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची योजना २०१२ मध्ये हाती घेतली. हे काम ‘तत्त्व ग्लोबल’ या खासगी ठेकेदाराला देण्यात आले. या कंपनीकडून मीटर बसविणे, पाण्याची बिले देणे, वसुली आदी कामे केली जातात. गेल्या दोन वर्षात या योजनेतून विश्रामबाग परिसरातील तीन हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात दोनशेहून अधिक नागरिकांना जादा बिले येत आहेत, अशी तक्रार आहे. नळाला पाणी येण्यापूर्वी पाईपलाईनमधून हवा येते. त्या हवेवर मीटर जोरात फिरते, त्याचे रिडिंग होत असल्याने जादा बिले येत असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. यापूर्वीही काही नागरिकांनी अशाच तक्रारी केल्या होत्या. तेव्हा ठेकेदाराने एअरव्हॉल बसवून त्यांच्या तक्रारीचे निकारण केले. आता पुन्हा याच तक्रारी येऊ लागल्या आहेत. सध्या या नागरिकांना दीड ते दोन हजारपर्यंत पाण्याची बिले येत आहेत. ठेकेदाराचे दोन वर्षातील १८ लाखांचे बिल थकित आहे.
याबाबत आज नगरसेविका मृणाल पाटील यांनी आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांच्या दालनात उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, मृणाल पाटील व ‘तत्त्व ग्लोबल’चे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी हवेचे रिडिंग होत नसल्याचे कंपनीने सिद्ध करावे, मगच बिले अदा केली जातील, असे स्पष्टपणे सांगितले. ठेकेदारानेही या मीटरची तपासणी करून शंकांचे निरसन करण्याची ग्वाही दिली आहे. (प्रतिनिधी)