दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वाॅक टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:25 AM2021-04-21T04:25:58+5:302021-04-21T04:25:58+5:30
सांगली : ऑक्सिजनची पातळी खाली आली आहे, रुग्णांना बेड हवा आहे, असे अनेक संदेश समाजमाध्यमातून सातत्याने फिरत असतात. लोकप्रतिनिधींसह ...
सांगली : ऑक्सिजनची पातळी खाली आली आहे, रुग्णांना बेड हवा आहे, असे अनेक संदेश समाजमाध्यमातून सातत्याने फिरत असतात. लोकप्रतिनिधींसह कोविड रुग्णालयांचे फोनही खणखणत असतात. अनेकांना ऑक्सिजनची लेवल कशी पहावी, हेही माहीत नसते. सहा मिनिटाचा वाॅक करून ऑक्सिजनची टेस्ट करावी. घरच्या घरी ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ही टेस्ट करून चिंतामुक्त होणे सहज शक्य आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. जिल्ह्यात दररोज ९०० हून अधिक पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. ऑक्सिजन, बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. सात हजारहून अधिक ॲक्टिव्ह रुग्ण असून अनेकजण गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जातो. त्यासाठी घरीच ऑक्सिजनची पातळी तपासणे शक्य आहे. ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ऑक्सिजनची लेवल तपासणी केली जाऊ शकते. त्यासाठी आधी ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनची पातळी पाहावी. त्यानंतर सहा मिनिटे घरीच वाॅक करावा, पुन्हा ऑक्सिजनची लेवल पाहावी. ती ९३ पेक्षा कमी झाली असेल तर डाॅक्टरांचा सल्ल्याने पुढील उपचार घ्यावेत.
चौकट
असे लागणार साहित्य- घड्याळ, पल्स ऑक्सिमीटर
चौकट
अशी करा चाचणी
आपल्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी.
चौकट
...तर घ्या काळजी
सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी झाली तर...
चालणे सुरू करण्यापूर्वीच्या पातळीपेक्षा चालणे झाल्यानंतर ही पातळी तीनपेक्षा अधिकने कमी झाली तर...
चालल्यानंतर धाप येणे दम लागल्यासारखे होत असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
चौकट
कोणी करायची ही टेस्ट?
सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील तर...
गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांनी दररोज ही चाचणी करावी.
चौकट
कोट
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असतील तर अनेकजण ऑक्सिजनची लेवल तपासतात. त्यातून रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कळते. सहा मिनिटांचा वाॅक करून पुन्हा ऑक्सिजनची लेवल तपासल्यास फुप्फुसाची ताकद समजून येते. जर लेवल कमी झाली असेल तर रुग्णाला उपचारासाठी दाखल करणे नातेवाईकांना सोयीचे होते. वेळेत उपचार झाल्याने रुग्णांची स्थिती गंभीर होत नाही. - डाॅ. रवींद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.