द्राक्षबागेची औषधे उधारीने घेताय? मग जरा जपूनच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:26+5:302021-05-27T04:27:26+5:30
सांगली : द्राक्ष हंगाम सुरू होताच उत्पादकांना अप्रत्यक्ष सावकारीचा सामना करावा लागत आहे. काही अैैाषध दुकानदार उधार औषध देताना ...
सांगली : द्राक्ष हंगाम सुरू होताच उत्पादकांना अप्रत्यक्ष सावकारीचा सामना करावा लागत आहे. काही अैैाषध दुकानदार उधार औषध देताना एमआरपीपेक्षा २५ ते ३० टक्के जादा दर लावत आहेत, म्हणजे वार्षिक ४५ टक्क्यांचा व्याजदर पडत आहे. याविरोधात द्राक्ष शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरून जागृतीची मोहीम सुरू केली आहे.
द्राक्ष शेतीची औषधे अत्यंत महागडी आहेत. त्यामुळे ती रोखीने खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नसतो. रोखीने खरेदीत सवलत मिळत असली, तरी पैशांची चणचण असते. वर्षभर उधारीने औषधे खरेदी करायची आणि द्राक्षे गेल्यानंतर पैसे भागवायचे, अशी प्रथा आहे. याचा गैरफायदा काही औषधविक्रेते घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. औषधाच्या एमआरपीपेक्षा २५ ते ३० टक्के जास्त किंमत लावली जाते. वास्तविक, औषधाचा एमआरपीदेखील मुळातच जास्त असतो. त्यावर पुन्हा जादा दर लावल्याने शेतकऱ्यांची लूट होते. मूळ किमतीपेक्षा ४५ टक्क्यांपर्यंत जादा खरेदीदर पडतो. गरजवंत शेतकऱ्याला कानाडोळा करण्याशिवाय पर्याय नसतो. ठरावीक दुकानदारांमुळे अन्य चांगल्या दुकानदारांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
चौकट
शेतकऱ्यांचे आवाहन
या लुटीविरोधात द्राक्ष शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरून मोहीम सुरू केली आहे. औषधे उधार घेत असाल तर जपून व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. उधारीचा दर रोखीपेक्षा कमाल १० टक्के जास्त असल्यास ठीक, अन्यथा पर्याय शोधावा. काही दुकानदार यापेक्षा जास्त किंमत लावून सावकारी करत आहेत. वार्षिक ४५ टक्क्यांपर्यंत व्याजदर पडत आहे. त्यामुळे उधारीचा मार्ग टाळण्याचा प्रयत्न करा. उधारीचे पैसे वेळीच चुकते करा. एमआरपी व एक्सपायरी तारीख पाहून औषध घ्या, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.
कोट
द्राक्षबागेच्या औषधांच्या किमती हजारो रुपयांच्या घरात आहेत. शेतकऱ्यांना लुटण्याचे काम औषध कंपन्या करत आहेत. काही मोजके दुकानदारही कंपन्यांच्या हातात हात घालून शेतकऱ्यांना लुबाडत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना एमआरपीमध्ये सवलत द्यायला हवी. उधार देत असला तरी हंगामाअखेर शेतकरी प्रामाणिकपणे पैसे आणून देतो, त्यामुळे जादा दर लावू नयेत.
- महादेव कोरे, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना