पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करायचा आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:29 PM2017-09-25T23:29:25+5:302017-09-25T23:29:25+5:30

Do you want to remove western Maharashtra vans? | पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करायचा आहे का?

पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करायचा आहे का?

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. तसे या सरकारला पश्चिम महाराष्ट्र सूतगिरणीमुक्त करावयाचा आहे का? असा थेट सवाल करीत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सूतगिरण्या मोडीत काढण्याचा डाव आहे, असा आरोप केला. याचवेळी त्यांनी राज्यातील सूतगिरणी व्यवसाय कर्जमुक्त करा, अशी मागणीही केली.
येथील दीनदयाळ मागासवर्गीय सूतगिरणीची २२ वी वार्षिक सभा सूतगिरणीच्या कार्यस्थळावर झाली. यावेळी डांगे यांनी मार्गदर्शन केले. सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार रामहरी रुपनवर, निती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य रघुनाथदादा पाटील, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रघुनाथदादा पाटील, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी निवड झालेले मकरंद देशपांडे यांच्यासह सूतगिरणीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
अण्णासाहेब डांगे म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये ३५ वर्षे काम केले. १५ वर्षांपूर्वी पक्ष सोडला. त्यानंतर आजअखेर एक शब्दही भाजपविषयी बोललो नव्हतो; मात्र आता अन्यायाची परिसीमा झाल्याने बोलणे भाग पडले. सूतगिरण्या बंद पडल्या, तर लाखो मजूर देशोधडीला लागतील. सरकारने वस्त्रोद्योगापुढे गांभीर्याने पाहावे. वस्त्रोद्योग मोठ्या संकटातून जात आहे. पुढच्या वर्षीची वार्षिक सभा होईल की नाही, हे सांगता येत नाही. १०० टक्के निर्यात करणाºया गिरण्यांकडून कोट्यवधीचे परकीय चलन देशाला मिळते. मात्र हा व्यवसायच बंद करण्याची मानसिकता दिसून येत आहे.
ते म्हणाले, विदर्भात ४ रुपये ५० पैसे प्रति युनिट वीजदर आहे; तर पश्चिम महाराष्ट्रात हाच दर ८ रुपये प्रति युनिट इतका आहे. एक किलो सुताची निर्मिती करताना २७ रुपयांचा तोटा सोसावा लागतो. कापूस महामंडळ मोडून दलालांच्या ताब्यात कापूस खरेदी-विक्रीचे अधिकार एकवटले आहेत. त्यामुळे हे सरकार गरिबांचे, शेतकºयांचे आहे का? भांडवलदारांचे आहे? हा प्रश्न आहे. हे सरकार भांडवलदारांची पूजा करत आहे. वीजदराच्या तफावतीमुळे या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र टिकणार नाही. आम्ही जिंदाल कंपनीकडून वीज घेतली तर, सरकारने त्यावर ३ टक्के कर लावला.
आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, व्यवसाय तोट्यात असतानाही दीनदयाळने नफा मिळवून सभासदांचे हित जोपासले आहे. वस्त्रोद्योगाबाबत सरकारची धोरणे अत्यंत चुकीची आहेत. सूतगिरण्यांच्या वीज दराबाबत नागपूर अधिवेशनात चर्चा घडवून आणणार आहे. सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे यांनी अहवाल सालात सूतगिरणीला २ कोटी ५५ लाख रुपयांचा रोकड नफा झाल्याची माहिती दिली. वस्त्रोद्योगाबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. यावेळी रघुनाथदादा पाटील, निशिकांत भोसले-पाटील, भगवानराव साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत कामगारांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
संचालक मकरंद देशपांडे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अ‍ॅड. राजेंद्र डांगे यांनी नोटीस वाचन केले. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. राजकुमार पाटील यांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, जि. प. सदस्य संभाजी कचरे, नगरसेवक वैभव पवार, शहाजी पाटील, माणिकराव गायकवाड, मंगल शिंगण, अशोक देसाई, एल. आर. पाटील, संचालक सुमंत महाजन, माणिक गोतपागर, प्रशांत कांबळे, मंगल पवार, एम. एन. कांबळे, अमोल चौधरी, संजय देवकुळे, अधिकारी, सभासद उपस्थित होते.
हुतात्मा संकुलाचे अभिनंदन
अण्णासाहेब डांगे यांनी राज्यातील सहकार क्षेत्राच्या पिछेहाटीबद्दल बोलतानाच गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३३५० रुपयांचा दर देणाºया हुतात्मा साखर कारखान्याचे अभिनंदन केले. इथेनॉल प्रकल्प उभारण्यापूर्वीच त्यांनी शासनाचे भागभांडवल परत करण्याचा विक्रम केला आहे. एकप्रकारे ही सहकारातील आर्थिक क्रांती आहे. नागनाथअण्णांचे वारसदार चांगल्या पध्दतीने काम करत आहेत, असे गौरवोद्गार डांगे यांनी काढले.

Web Title: Do you want to remove western Maharashtra vans?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.