Sangli crime: कौटुंबिक वादातून कुपवाडमध्ये डॉक्टर भावाचा विळ्याने वार करुन खून, संशयित जेरबंद
By शीतल पाटील | Published: April 26, 2023 04:08 PM2023-04-26T16:08:57+5:302023-04-26T16:09:23+5:30
पतीवर झालेल्या हल्ल्याने पत्नी सरस्वती भितीने थरथर कापत आपल्या दोन्ही लहान मुलांना घेऊन फ्लॅटबाहेर जाऊन लपून बसल्या होत्या
सांगली/कुपवाड : कुपवाड येथे कौटुंबिक वादातून फार्मासिस्ट असलेल्या लहान भावाने डॉक्टर असलेल्या मोठ्या भावाचा आज, बुधवारी सकाळी विळ्याने वार करून खून केला. अनिल बाबाजी शिंदे (वय ४५, सध्या रा. रोहीदास गल्ली, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद आहे. या प्रकरणी संपत बाबाजी शिंदे (वय ३५, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) या संशयित भावास एका तासात पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अनिल शिंदे यांचा पाण्याच्या टाकी चौकालगत मुख्य एमआयडीसी रस्त्यावर आधार क्लिनिक नावाने दवाखाना आहे. त्यांचे मुळ गाव वडगाव (ता. तासगाव) असून सध्या मिरज रस्त्यावरील महादेव मंदिरासमोरील माऊली अपार्टमेंटमध्ये भाड्याने पत्नी व मुलांसह राहत होते.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास डॉ. अनिल शिंदे घरात ज्ञानेश्वरी वाचन करीत होते. त्यावेळी त्यांची पत्नी सरस्वती व दोन लहान मुले नाष्टा करत बसले होते. यावेळी अचानक संशयित संपतने दरवाजाला जोरात लाथ मारून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. ‘अन्या कुठं आहे’ असे ओरडत डॉ. शिंदे यांच्यावर विळ्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी पत्नी सरस्वती ही भितीने थरथर कापत आपल्या ओम व साई या दोन्ही लहान मुलांना घेऊन फ्लॅटबाहेर जाऊन लपून बसल्या होत्या. त्यानंतर भाऊ अनिल हा निपचित पडल्याचे पाहून संपतने घटनास्थळावरून पळ काढला.
काही नागरीकांनी घटनेची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांना दिली. त्यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच पसार झालेल्या हल्लेखोर संपत याची माहिती घेवून एका तासात त्याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याने कौटुंबिक वादातून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी दिली. या हल्ल्यात वापरलेला विळा पोलिसांकडून जप्त केला. घटनास्थळी ठसे तज्ञांनी पाहणी केली.
महिन्यात दुसरा खून
कुपवाडमध्ये बामनोली रस्त्यावर १६ एप्रिल रोजी अमर जाधव या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाला होता. त्यानंतर बुधवारी डॉ. अनिल शिंदे यांचा खून झाला. एका महिन्यात खुनाच्या झालेल्या सलग दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे. या खूनाच्या घटनेमुळे कुपवाड शहर हादरले आहे.