डॉक्टर दाम्पत्याच्या खुनाचे धागेदोरे हाती
By admin | Published: December 27, 2015 12:09 AM2015-12-27T00:09:44+5:302015-12-27T00:09:44+5:30
गतीने तपास : सेविकेसह प्रियकराकडे चौकशी; आणखी चौघांचा सहभाग शक्य
इस्लामपूर : येथील जावडेकर चौकातील डॉ. प्रकाश कुलकर्णी व त्यांची पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांच्या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता दिसत आहे. त्यांच्या रुग्णालयात वयाच्या चौदा वर्षापासून काम करणारी सेविका आणि तिचा प्रियकर या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पाच दिवस होऊन गेले तरी, पोलिसांनी तपासाबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. या दुहेरी खुनाचे खरे सूत्रधार वेगळेच असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे.
डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या खून प्रकरणाला आठवडा झाला तरी, तपासाला फारशी गती मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या तपास कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हिवाळी अधिवेशनात आ. जयंत पाटील यांनी हा दुहेरी खून आणि वाळवा तालुक्यातील गुन्हेगारीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. हा तपास करताना पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. डॉ. पती-पत्नीचा खून अनैतिक संबंधाला असलेल्या विरोधातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवून आतापर्यंत त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह शंभरहून अधिक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली आहे.
रुग्णालयातील एक सेविका व तिचा प्रियकर पोलिसांच्या हाती लागला आहे. परंतु या दोघांना अन्य चार ते पाचजणांची साथ असल्याचे स्पष्ट झाले आहे, पण पोलीस कारवाई टाळण्यासाठी या साथीदारांनी शहरातून पलायन केले आहे. त्यांचा शोध सुरूअसला तरी, अद्याप यश मिळाले नाही. हे साथीदार हाती लागल्यास कदाचित तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे.
इस्लामपूर शहर परिसरात या खुनाविषयी वेगवेगळ््या अफवा पसरविल्या जात आहेत. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रेही एकाच्या घरात सापडली आहेत, परंतु याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. आ. जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात दुहेरी खून व तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे पोलीस यंत्रणा हादरली आहे.
घटनेदिवशी (शनिवारी) रात्री दहापर्यंत संशयित सेविका कामावर होती. तिने रात्री दहा वाजता कामावरून सुट्टी करून घेतली. रात्रपाळीसाठी दुसरी सेविका कामावर रुजू झाली. त्यावेळी ‘डॉक्टर आजारी आहेत, ते झोपले आहेत, त्यांना कोणीही त्रास देऊ नका’, असे सांगून संशयित सेविका रुग्णालयातून बाहेर पडली होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
रविवारी सकाळी नऊ वाजता हीच संशयित सेविका नेहमीप्रमाणे कामावर आली आणि तिनेच डॉक्टर घराचा दरवाजा उघडत नसल्यानंतर आरडाओरडा केला. त्यानंतर दुहेरी खुनाचा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)
डॉक्टर कुलकर्णी यांची बदनामी होऊ नये, यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे. खंडणीसाठी डॉक्टर दाम्पत्याचा खून झाल्याचे दाखविण्याच्या हालचाली सुरू आहेत. खुनाचे कारण निष्पन्न झाले आहे. संशयितांची नावेही रेकॉर्डवर आली आहेत. पण या प्रकरणाची ‘मूळ स्टोरी’ बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याने या तपासाला विलंब लागत असल्याची चर्चा आहे.
आणखी दोघे ताब्यात
डॉक्टरांच्या दुहेरी खूनप्रकरणी शहरातील आणखी दोघांना शनिवारी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका प्लंबर व्यावसायिकाचा समावेश आहे. या दोघांनी कोयत्यासह अन्य शस्त्रांची जुळवाजुळव केल्याचे चौकशीतून समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती. पण पोलिसांनी त्यांची नावे सांगण्यास नकार दिला.