डॉक्टर दाम्पत्य खून प्रकरण तिघे ताब्यात; कसून चौकशी

By Admin | Published: December 30, 2015 12:56 AM2015-12-30T00:56:23+5:302015-12-30T00:57:03+5:30

इस्लामपुरात धरपकड :

Doctor holds a double murder case; Thorough investigation | डॉक्टर दाम्पत्य खून प्रकरण तिघे ताब्यात; कसून चौकशी

डॉक्टर दाम्पत्य खून प्रकरण तिघे ताब्यात; कसून चौकशी

googlenewsNext

सांगली : इस्लामपूर येथील डॉ. प्रकाश कुलकर्णी व त्यांच्या पत्नी डॉ. अरुणा यांच्या खून प्रकरणाचा तपास सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाकडे सोपविण्यात आला आहे. तपासाची सूत्रे येताच गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने इस्लामपुरात तळ ठोकून पुढील तपास सुरू ठेवला आहे. मंगळवारी दुपारी आणखी तीन संशयितांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती. खुनामागच्या ठोस कारणांचा शोध सुरू ठेवला आहे.
गेल्या आठवड्यात कुलकर्णी दाम्पत्याचा घरात घुसून खून करण्यात आला होता. अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या या खुनाचा छडा लावणे मोठे आव्हान होते. इस्लामपूर (पान ६ वर)

(पान १ वरून) पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तपणे तपास सुरू ठेवला होता. त्यामुळे तपासाला गती मिळाली होती. चार दिवसांपूर्वी खुनाचा छडा लावण्यात यश आले होते. याप्रकरणी कुलकर्णी यांच्या रुग्णालयातील महिला मदतनीस सीमा यादव, तिचा प्रियकर नीलेश दिवाणजी व मित्र अर्जुन पवार या तिघांना अटक केली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी तीन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. काही संशयितांनी पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच पलायन केले आहे. मंगळवारी दुपारपर्यंत तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांचा प्रत्यक्ष खुनात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते; पण चौकशी करून व पुरावे गोळा झाल्यानंतर त्यांना अटक केली जाणार आहे.
कुलकर्णी दाम्पत्याच्या खुनात दहा ते बाराजणांचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येकाचा नेमका सहभाग किती होता? खून करण्यामागे काय कारण होते? खुनाचा कट कोठे शिजला? प्रत्यक्ष मारायला किती संशयित कुलकर्णी यांच्या घरात गेले होते? या सर्व बाबींचा उलगडा झालेला नाही. तपासाचा गुंता वाढत असल्याने जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी सोमवारी रात्री हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला. सुरुवातीपासूनच हा विभाग तपासात होता; पण आता संपूर्ण तपासच त्यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांचे पथक मंगळवारी दिवसभर इस्लामपुरात तळ ठोकून होते. अटकेत असलेल्या संशयित सीमा यादव, नीलेश दिवाणजी व अर्जुन पवार या तिघांकडे स्वतंत्र चौकशी सुरू ठेवली आहे; पण त्यांच्याकडून विसंगत माहिती मिळत आहे. (प्रतिनिधी)

मारेकरी कोण : ‘सुपारी’ दिल्याचा संशय
आतापर्यंतच्या तपासात मारेकरी कोण आहेत? ते स्थानिक आहेत की, बाहेरील जिल्ह्यातील, याचा पोलिसांनी अद्याप उलगडा केलेला नाही. अटकेत असलेली सीमा यादव, नीलेश दिवाणजी व अर्जुन पवार यांनी मारेकऱ्यांना कुलकर्णी यांच्या घराचा रस्ता दाखविला असल्याची बाब पुढे येत आहे. त्यामुळे मारेकरी कोण होते? त्यांना पोलीस कधी अटक करणार? याकडे इस्लामपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. मारेकऱ्यांना ‘सुपारी’ देऊन हा दुहेरी खून केला असण्याची चर्चा सुरू आहे.

रोकड गायब?
घटनेपूर्वी डॉ. कुलकर्णी यांच्याकडे एका व्यवहारातील २० ते २५ लाखांची रोकड आली होती. ही रक्कम गायब असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खुनामागे हे कारणही असू शकते; पण यासंदर्भात पोलिसांकडे कोणतीही ठोस माहिती नाही. तरीही रोकड गायबचा धागा पकडून तपास सुरू ठेवला आहे.
मोबाईल चोरीला
दोन महिन्यांपूर्वी कुलकर्णी यांच्या घरातून मोबाईलची चोरी झाली होती. त्यामध्ये काही चित्रफिती होत्या, असे समजते. हा मोबाईलही खुनानंतर गायब झाला असल्याचा नवीन मुद्दा चर्चेतून पुढे आला आहे. या मोबाईल चोरीत संशयित सीमा यादव व अर्जुन पवार या दोघांचा सहभाग असल्याची चर्चा आहे.

Web Title: Doctor holds a double murder case; Thorough investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.