संख आरोग्य केंद्रात दोन दिवसांपासून डॉक्टर गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:09+5:302021-04-28T04:28:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : संख (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दोन दिवसांपासून हजर नसल्याने डॉक्टरविना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : संख (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दोन दिवसांपासून हजर नसल्याने डॉक्टरविना रुग्ण तपासणी, लसीकरण केंद्र सुरू आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये आरोग्य सेवेचा समावेश असतानासुद्धा
आरोग्य केंद्रातील दोन डॉक्टरपैकी एक डॉक्टर रजेवर, तर दुसरे डॉक्टर अनुपस्थित आहेत.
ऐन कोरोनाकाळात आरोग्य केंद्राची अवस्था असून अडचण, नसून खोळांबा अशी झाली आहे. रुग्णांवर ताटकळत वाट पाहण्याची वेळ आली आहे.
संख आरोग्य केंद्राला २००८ मध्ये राज्यस्तरीय आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. दवाखान्याची सुसज्ज इमारत आहे. आरोग्य केंद्रात १६ गावे समाविष्ट आहेत. यामध्ये संख, अंकलगी, गोंधळेवाडी, दरीबडची, लमाणतांडा (दरीबडची ), खंडनाळ, तिल्याळ, जालिहाळ खुर्द, सिद्धनाथ, मुचंडी, दरीकोणूर, पांढरेवाडी, आसंगी तुर्क, धूळकरवाडी, मोटेवाडी, पांडोझरी ही गावे आहेत. दरीबडची, अंकलगी, आसंगी तुर्क, मुचंडी, संख, आसंगी (जत) ही ६ उपकेंद्र आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोन डॉक्टर कार्यरत आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे शासनाचे आदेश असतानासुध्दा दोनपैकी एक डॉक्टर रजेवर तर दुसरे डॉक्टर अनुपस्थित आहेत. डॉक्टरविना केसपेपर काढले जात आहेत. रुग्णांना औषधे डॉक्टरविना दिली जात आहेत. रॅपिड टेस्ट, सर्व उपचार आरोग्य सेविका करीत आहेत. अंकलगी येथील शेतकरी साबू कल्लाप्पा कोलकर (वय ६५) हे कालपासून रेबिज इंजेक्शन घेण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. डॉक्टर नसल्याने उपचार झालेले नाही.
तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर यांनी डॉ. मणेरे यांना संख आरोग्य केंद्रात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. पण तेही मंगळवारपर्यंत हजर नव्हते. डॉक्टर नसल्याने रुग्णांना ताटकळत वाट पाहत थांबवे लागत आहे.
आरोग्य केंद्रातील १०८ जीवनदायी रुग्णवाहिका तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. डॉक्टर नसल्याने तीन महिन्यांपासून ही रुग्णवाहिका बंद आहे.
कोट
संख येथील आरोग्य अधिकाऱ्याला गैरहजरबाबत नोटीस काढली आहे. दुसऱ्या महिला डॉक्टर लग्न कार्यक्रमासाठी रजेवर आहेत. मुचंडी येथील डॉक्टरांना तत्काळ संखला हजर राहण्यास सांगितले आहे.
-संजय बंडगर,
तालुका वैद्यकीय अधिकारी