डॉक्टर महिलेचा सांगलीत विनयभंग- दागिने घेतले : दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 08:55 PM2019-02-26T20:55:57+5:302019-02-26T20:57:24+5:30
येथील शंभरफुटी रस्त्यावरील एका ३८ वर्षीय डॉक्टर महिलेस रुग्णालय काढण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे.
सांगली : येथील शंभरफुटी रस्त्यावरील एका ३८ वर्षीय डॉक्टर महिलेस रुग्णालय काढण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मिरजेतील दोन आयुर्वेद औषध विक्री प्रतिनिधींविरुद्ध सोमवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासीन मुश्रीफ व तबस्सम मुश्रीफ (मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
पीडित डॉक्टर महिला सांगलीतील आहे. तिचे शंभरफुटी रस्त्यावर रुग्णालय आहे. पाच वर्षापूर्वी संशयित तिच्याकडे आयुर्वेदिक औषधे विक्री करण्यास आले होते. त्यानंतर ते सातत्याने तिच्याकडे येऊ लागले. यातून त्यांच्यात चांगली ओळख झाली. यातून संशयितांनी डॉक्टर महिलेस ‘आपण मोठे रुग्णालय काढून, गोरगरीब रुग्णांवर स्वस्तात उपचार करू’, असे आमिष दाखविले. रुग्णालय काढण्यासाठी त्यांनी या डॉक्टर महिलेकडून सोन्याचे दागिने घेतले. तसेच रुग्णालयात आल्यानंतर तिच्याशी अनेकदा अश्लील वर्तनही केले. महिलेने रुग्णालय कधी काढायचे, अशी विचारणा केल्यानंतर मात्र ते टाळाटाळ करु लागले. तसेच गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी रुग्णालयात येणेही बंद केले होते. त्यामुळे महिलेने सोमवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार यासीन व तबस्सम मुश्रीफ यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.