कोरोना उपचाराची फाईल मागणाऱ्यास डॉक्टरांची शिवीगाळ, दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:20+5:302021-05-08T04:28:20+5:30
इस्लामपूर : कोरोनाचे उपचार सुरू असताना, मृत्यू झालेल्या भावाच्या उपचाराची फाईल मागण्यासाठी गेलेला मृताचा भाऊ आणि त्याच्या मित्राला डॉ. ...
इस्लामपूर : कोरोनाचे उपचार सुरू असताना, मृत्यू झालेल्या भावाच्या उपचाराची फाईल मागण्यासाठी गेलेला मृताचा भाऊ आणि त्याच्या मित्राला डॉ. सचिन सांगळूरकर, त्यांची पत्नी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना दुपारी दीडच्यासुमारास घडली. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.
याबाबत मृताचा भाऊ गणेश वसंत पाटील (३८, रा. कापूसखेड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, त्यांचे भाऊ धोंडीराम पाटील (वय ४२) यांच्यावर डॉ. सांगळूरकर यांच्या रुग्णालयात १५ एप्रिलपासून उपचार सुरू होते. मात्र २ रोजी त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पाटील कुटुंबाने या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दुपारी गणेश पाटील हे रामदास कचरे या मित्रासोबत भावावर झालेल्या उपचाराची फाईल मागण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी तेथे असणाऱ्या डॉ. सचिन सांगळूरकर, त्यांची पत्नी आणि कर्मचाऱ्यांनी ‘कसली फाईल आम्हाला माहीत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’ अशी उद्धट भाषा वापरत शिवीगाळ आणि दमदाटी केली.
दरम्यान, डॉ. सांगळूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गणेश पाटील, शाकीर तांबोळी, सनी खराडे, चंद्रकांत पाटील, रामदास कचरे, रूपाली पाटील आणि इतर ५०-६० जणांनी रुग्णालयात येऊन वैद्यकीय सेवेत अडथळा निर्माण केला. तसेच कोविड नियमावलीसह जमावबंदी, संचारबंदीचा भंग केला.