परदेशातून आलेले डॉक्टर नोंदणी क्रमांकाअभावी ‘सलाईन’वर; महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेबद्दल नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:43 PM2024-09-10T12:43:36+5:302024-09-10T12:43:56+5:30

सांगली : परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या महाराष्ट्रातील डॉक्टरांना निकालानंतरही अनेक महिने नोंदणी क्रमांकासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ...

Doctors in Maharashtra who have returned from abroad for medical education, wait for registration number even after results | परदेशातून आलेले डॉक्टर नोंदणी क्रमांकाअभावी ‘सलाईन’वर; महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेबद्दल नाराजी

परदेशातून आलेले डॉक्टर नोंदणी क्रमांकाअभावी ‘सलाईन’वर; महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेबद्दल नाराजी

सांगली : परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या महाराष्ट्रातील डॉक्टरांना निकालानंतरही अनेक महिने नोंदणी क्रमांकासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेऊ पाहणाऱ्या किंवा प्रॅक्टिस करण्याचे नियोजन केलेल्या डॉक्टरांसमोर अडचणींचा बांध निर्माण झाला आहे.

परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात आलेल्या व येथील परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा (एफएमजीई) उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांना संबंधित राज्यातील परिषदेमार्फत सुरुवातीला तात्पुरता व नंतर कायम नोंदणी क्रमांक दिला जातो. याआधारे संबंधित डॉक्टर स्थानिकांना सेवा देऊ शकतात, नोकरी करु शकतात किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने चार महिन्यांपासून अशा मुलांना नोंदणी क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे यामधील काही मुले जी पदव्युत्तर परीक्षा पास झालेली आहेत परंतु त्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे तसेच काही मुलांना नोकरी व वैद्यकीय सेवा द्यायची आहे अशा मुलांना कायमचा नोंदणी क्रमांक न मिळाल्यामुळे अडचणी येत आहेत.

भारतातील अनेक विद्यार्थी दरवर्षी रशिया, अझर बैजान, कझाकिस्तान, किर्गीस्तान, उझबेकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, चीन, रुमानिया, फिलीपाईन्स, जॉर्जिया या देशांत वैद्यकीय पदवीचे (एम.बी.बी.एस.) शिक्षण घेण्यासाठी जातात. तेथून शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर भारतात थेट सेवा करण्यास मान्यता नाही. त्यासाठी आधी पात्रता परीक्षा द्यावी लागते आणि तिची काठीण्य पातळी खूप अधिक आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल सातत्याने कमी लागला आहे.

यावर्षी ३४ हजार ६०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी केवळ ७ हजार २३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण डॉक्टरांमधील जे महाराष्ट्रातील आहेत त्यांना अद्याप नोंदणी क्रमांक न मिळाल्याने त्यांचा पुढील वैद्यकीय प्रवास थांबला आहे.

अशी असते नोंदणी क्रमांकाची प्रक्रिया

प्रथमता मिळालेला नोंदणी क्रमांक हा तात्पुरता असतो आणि त्यानंतर संबंधित डॉक्टरांना भारतात इंटर्नशिप करावी लागते. ती पूर्ण झाल्यानंतर या मुलांना कायमचा नोंदणी क्रमांक मिळतो. त्यानंतर त्यांचा भारतातील पदव्युत्तर शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सेवेचा मार्ग सुकर होतो.

Web Title: Doctors in Maharashtra who have returned from abroad for medical education, wait for registration number even after results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.