‘सिव्हिल’च्या निवासी डॉक्टरांना दोन महिन्यांपासून पगार नाही, प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 03:49 PM2022-08-20T15:49:53+5:302022-08-20T15:50:20+5:30
निवासी डॉक्टर्स व आंतरवासिता डॉक्टरांच्या वेतनाची अनियमितता संपूर्ण राज्यात सुरू आहे
मिरज : सांगली व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पावणेदोनशे निवासी व दोनशे आंतरवासिता डाॅक्टरांना गेले दोन महिने पगार मिळालेला नाही. शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने जून व जुलै या दोन महिन्यांचे वेतन अद्याप थकल्याने प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांमध्ये नाराजी आहे.
सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात चारशे प्रशिक्षणार्थी डाॅक्टर कार्यरत आहेत. कोरोना साथीच्या काळात या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्णसेवा केल्याने रुग्णांना मोठा आधार मिळाला होता. एमबीबीएसनंतर तीन वर्षे एमडी या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डाॅक्टरांना दरमहा ६५ हजार व एमबीबीएसनंतर एक वर्षाचे वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. या प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना गेले वर्षभर वेतन अनियमित मिळत आहे. यावर्षी जून व जुलै या दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा करणाऱ्या या निवासी डॉक्टरांना वेतन मिळालेले नाही.
निवासी डॉक्टर्स व आंतरवासिता डॉक्टरांच्या वेतनाची अनियमितता संपूर्ण राज्यात सुरू आहे. यामुळे आधीच कामाच्या तणावाखाली असलेले निवासी डॉक्टर्स आर्थिक तणावाखाली आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील स्थायी डाॅक्टर व प्राध्यापकांना नियमित वेतन मिळते. प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरांची पदे अस्थायी असून, वेतनासाठी शिक्षण सोडून जाऊ शकत नसल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू असल्याची निवासी डाॅक्टरांची प्रतिक्रिया आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे निवासी डॉक्टरांमध्ये रोष आहे. आर्थिक अडचणीमुळे कामावर परिणाम होत असल्याने शासनाने अनुदानाची व्यवस्था करून नियमित वेतन देण्याची निवासी डॉक्टरांची मागणी आहे.
दोन महिन्यांनंतर एकच महिन्याचे विद्यावेतन
गेले वर्षभर दोन महिन्यांनंतर केवळ एकच महिन्याचे विद्यावेतन देण्यात येत आहे. बहुसंख्य प्रशिक्षणार्थी डाॅक्टर परराज्यातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले असून, दोन महिने झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात एकदा विद्यावेतन मिळत असल्याने निवासी डॉक्टर आर्थिक अडचणीत आहेत. आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जून, जुलै महिन्याच्या विद्यावेतनाची प्रतीक्षा सुरू आहे.