महापालिका स्वच्छता निरीक्षकावर कुत्र्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:18 PM2021-05-15T12:18:16+5:302021-05-15T12:22:27+5:30
Dog Sangli : विजयनगर येथे स्वच्छेतेचे काम सुरु असताना महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी यांच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला. चेहऱ्याचे लचके तोडल्याने त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने स्वच्छतेच्या कामात गुंतलेले अन्य कर्मचारीही हादरले आहेत.
सांगली : विजयनगर येथे स्वच्छेतेचे काम सुरु असताना महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी यांच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला. चेहऱ्याचे लचके तोडल्याने त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने स्वच्छतेच्या कामात गुंतलेले अन्य कर्मचारीही हादरले आहेत.
विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस वाढलेली झुडपे काढण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक सकाळी गेले होते. जेसीबीच्या सहाय्याने याठिकाणी स्वच्छता करण्यात येत होती. कामाची पाहणी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक मद्रासीही त्याठिकाणी कर्मचाऱ्यांसोबत हजर होते.
परिसरातच मोकाट कुत्र्यांचे टोळके फिरत होते. त्यातील एका कुत्र्याने मद्रासी यांच्यावर हल्ला केला. अन्य कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला हटकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या मोकाट कुत्र्याने मद्रासी यांच्यावर हल्ला चढवित तोंडाचे लचके तोडले. कर्मचारी मदतीला धावल्यानंतर कुत्रे पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत मद्रासी यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने स्वच्छता कर्मचारीही हादरले आहेत.
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून गेल्या काही वर्षात लहान मुले, नागरिकांवर हल्ल्यांच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.
शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये ही घटना घडली. याबाबत या भागातील नगरसेविका सविता मदने म्हणाल्या की, स्वच्छता निरीक्षकावर झालेल्या हल्ल्यानंतर तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का? प्रभागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे अनेक वेळा तक्रार केली. मात्र दखल घेतली जात नाही. लहान मुले, नागरिकच काय? जनावरांवरही कुत्री हल्ला करतात. त्याकडे महापालिकेने गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे