महापालिका स्वच्छता निरीक्षकावर श्वानाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:35+5:302021-05-16T04:24:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विजयनगर येथे स्वच्छतेचे काम सुरू असताना महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी यांच्यावर मोकाट श्वानाने ...

Dog attack on municipal sanitation inspector | महापालिका स्वच्छता निरीक्षकावर श्वानाचा हल्ला

महापालिका स्वच्छता निरीक्षकावर श्वानाचा हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विजयनगर येथे स्वच्छतेचे काम सुरू असताना महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी यांच्यावर मोकाट श्वानाने हल्ला केला. चेहऱ्याचे लचके तोडल्याने त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने स्वच्छतेच्या कामात गुंतलेले अन्य कर्मचारीही हादरले आहेत.

विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या मागच्या बाजूला वाढलेली झुडपे काढण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक सकाळी गेले होते. जेसीबीच्या साह्याने या ठिकाणी स्वच्छता करण्यात येत होती. कामाची पाहणी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक मद्रासीही कर्मचाऱ्यांसोबत तेथे हजर होते. परिसरातच मोकाट श्वानांचे टोळके फिरत होते. त्यातील एका श्वानाने मद्रासी यांच्यावर हल्ला केला. अन्य कर्मचाऱ्यांनी ््त्याला हटकण्याचा प्रयत्न केला, मात्र श्वानाने मद्रासी यांच्यावर हल्ला चढवित तोंडाचे लचके तोडले. कर्मचारी मदतीला धावल्यानंतर कुत्रे पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत मद्रासी यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने स्वच्छता कर्मचारीही हादरले आहेत.

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून, गेल्या काही वर्षांत लहान मुले, नागरिकांवर हल्ल्यांच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.

शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये ही घटना घडली. याबाबत या भागातील नगरसेविका सविता मदने म्हणाल्या की, स्वच्छता निरीक्षकावर झालेल्या हल्ल्यानंतर तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का? प्रभागात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे अनेकवेळा तक्रारी केली, मात्र दखल घेतली जात नाही. लहान मुले, नागरिकच काय पाळीव जनावरांवरही हे श्वान हल्ला करतात. त्याकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

चौकट

शेळ्यांवरही हल्ला

याच प्रभागातील श्रीरामनगर परिसरात काही दिवसांपूर्वी शेळींच्या कळपावर श्वानांनी हल्ला केला होता. शेळ्यांचेही लचके तोडले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

चौकट

डॉग व्हॅन ठरतेय कुचकामी

महापालिकेची डॉग व्हॅन शहरातून फिरत असली तरी त्यांच्या हाती श्वान लागत नाही. श्वानांच्या लसीकरणाच्या मोहिमेबद्दल योग्य नियोजन नाही, त्यामुळे मोकाट श्वानांची संख्या व उपद्रव वाढत आहे.

Web Title: Dog attack on municipal sanitation inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.