सांगली: टाकळीत कुत्र्यांच्या शर्यतीच्या नावावर श्वानप्रेमींची फसवणूक, जमावाने आयोजकास चोपले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:55 PM2022-08-19T12:55:37+5:302022-08-19T12:56:11+5:30
आयोजक बेपत्ता झाल्याने एकच गोंधळ उडाला
मिरज : टाकळी, ता. मिरज येथे कुत्र्यांच्या शर्यतीच्या नावावर पैसे वसूल करून श्वानप्रेमींची लाखोंची फसवणूक करणाऱ्या एकाला जमावाने चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. शर्यतीसाठी कोकण व कर्नाटकातून आलेल्या श्वानप्रेमींची फसवणूक करून सूरज भोसले या आयोजकाने पळ काढल्याने संतप्त जमावाने भोसले याच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
टाकळीत इस्त्री व्यवसाय करणाऱ्या सूरज भोसले या तरुणाने गुरुवारी टाकळीत शिकारी श्वानांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. दुचाकीसोबत श्वान पळविण्याच्या शर्यतीसाठी पहिले बक्षीस दुचाकी, दुसरे बक्षीस फ्रीज व तिसरे बक्षीस सायकल होती. या स्पर्धेची सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आल्याने सांगली, मिरज परिसरासह विजापूर, अथणी, सांगोला, रत्नागिरी येथील सुमारे ५० शिकारी श्वान स्पर्धेत भाग घेण्यासाठी टाकळीत आले होते.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतले होते. गुरुवारी सकाळी सर्वजण टाकळीत ही आगळीवेगळी स्पर्धा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती. मात्र, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व श्वानांऐवजी केवळ दहा श्वानांना पळविण्यात आले. त्यानंतर आयोजक सूरज भोसले तेथून बेपत्ता झाल्याने एकच गोंधळ उडाला. परजिल्ह्यातून आलेल्या संतप्त श्वानमालक व जमावाने सूरज भोसले याच्या टाकळीतील घराकडे मोर्चा वळविला.
भोसले तेथे नसल्याने जमाव संतप्त झाला. गावातील तरुणांनी सूरज भोसले यास शोधून काढत त्यास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. सूरज भोसले याने श्वानप्रेमींची फसवणूक करून त्यांना सुमारे लाखाचा गंडा घातल्याची तक्रार आहे. श्वानांची बेकायदा शर्यत आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांमुळे अनर्थ टळला
जमावाने भोसले याच्या घरावर चाल केल्यानंतर टाकळीचे पोलीस पाटील संजय माने जमावाला रोखून याबाबत पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी तातडीने टाकळीत जाऊन जमावाला तेथून पांगवून भोसले यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.