मिरजेत कुत्र्याने बालिकेचे लचके तोडले
By admin | Published: August 9, 2016 11:02 PM2016-08-09T23:02:36+5:302016-08-09T23:53:53+5:30
नागरिकांचे आंदोलन : अंत्ययात्रा काढून कुत्रे महापालिका कार्यालयात टाकले
मिरज : मिरजेत नदीवेस परिसरात धुळूबुळू गल्लीत कैवल्य अजय रुईकर या तीन वर्षाच्या बालकाचे मोकाट कुत्र्याने लचके तोडले. नागरिकांनी या कुत्र्याला ठार मारून त्याची अंत्ययात्रा काढून महापालिकेच्या कार्यालयात मृत कुत्रे टाकले. सुमारे दोन तास मृत कुत्रे महापालिका कार्यालयात ठेवून महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
धुळूबुळू गल्लीत सोमवारी दुपारी घराबाहेर खेळणाऱ्या कैवल्य रुईकर या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला चढवून त्याच्या तोंडाचे लचके तोडले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कैवल्य यास मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर नागरिकांनी या मोकाट कुत्र्याचा पाठलाग करुन त्याला ठार मारले. मृत कुत्र्याचा मृतदेह दोन दिवस तेथेच पडल्याने, संतप्त नागरिकांनी मंगळवारी या कुत्र्याची अंत्ययात्रा काढून मृतदेह महापालिका कार्यालयात आणून टाकला. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
तानाजी रुईकर, अजय रुईकर, गणेश धुळूबुळू यांच्यासहआंदोलकांनी उपायुक्त टीना गवळी यांना, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत व स्वच्छता साफसफाईच्या मागणीचे निवेदन दिले. टीना गवळी यांनी मोकाट कुत्री पकडण्यासाठी डॉग व्हॅनची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)
आंदोलकांना कोंडले
महापालिका कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी आंदोलकांना पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या. यामुळे आंदोलकांना कुत्र्याच्या तिरडीसह सुमारे दीड तास कोंडून ठेवण्यात आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.