बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा, मेंढी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:27 AM2021-03-10T04:27:02+5:302021-03-10T04:27:02+5:30
पुनवत : खवरेवाडी (ता. शिराळा) येथील विजय आनंदा खोत यांच्या जनावरांच्या वस्तीवर बंदिस्त लाकडी पिंजऱ्यात बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने ...
पुनवत : खवरेवाडी (ता. शिराळा) येथील विजय आनंदा खोत यांच्या जनावरांच्या वस्तीवर बंदिस्त लाकडी पिंजऱ्यात बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला पळवून नेऊन ठार केले. सोमवारी रात्री ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वी एका मेंढपाळाची मेंढी शेतातच ठार केली. या दोन घटनांनी परिसरातील ग्रामस्थ हादरून गेले आहेत. वनविभागाने पुढील धोका ओळखून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खवरेवाडी येथे विजय आनंदा खोत यांचे गावलगतच नवीन घर व जनावरांचे शेड आहे. या शेडच्या बाहेरील बंदिस्त लाकडी पिंजऱ्यात त्यांचा पाळीव कुत्रा बांधला होता. मध्यरात्रीच्या सुमारास या पिंजऱ्याचे लाकडी कुंपण तोडून बिबट्याने या कुत्र्याला पळवून नेले. मंगळवारी सकाळी नाळवे नावाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा कुत्रा मृतावस्थेत आढळला. तो अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत होता तर दोन दिवसांपूर्वी शिवारात एका भटक्या मेंढपाळाची मेंढी बिबट्याने फस्त केली. बिबट्याच्या हल्ल्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. तडवळे येथील बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाला जीव गमवावा लागला आहे. रिळे येथेही बिबट्याने मोठे नुकसान केले आहे. वनविभागाने बिबट्याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.