जांभळेवाडीच्या अंध तेजस्विनीचे ‘डोळस’ यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:25 AM2021-09-13T04:25:58+5:302021-09-13T04:25:58+5:30

सहदेव खोत लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : जांभळेवाडी (ता. शिराळा) येथील जन्मतःच अंध असलेल्या तेजस्विनी पांडुरंग पवार हिने जिद्द ...

The ‘Dolas’ success of the blind Tejaswini of Jambhalewadi | जांभळेवाडीच्या अंध तेजस्विनीचे ‘डोळस’ यश

जांभळेवाडीच्या अंध तेजस्विनीचे ‘डोळस’ यश

Next

सहदेव खोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुनवत : जांभळेवाडी (ता. शिराळा) येथील जन्मतःच अंध असलेल्या तेजस्विनी पांडुरंग पवार हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर नावाप्रमाणेच तेजोमय यश मिळविले. बँक ऑफ इंडियात लिपिक व ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा उत्तीर्ण होऊन दुहेरी यश संपादन केले. तिच्या या ‘डोळस’ यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तेजस्विनी यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील जन्मतःच त्या अंध. पण शाळा शिकण्याची ओढ म्हणून त्यांनी गावातीलच प्राथमिक शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केला. तिसरीपर्यंत शिक्षणही पूर्ण केले. मात्र या शिक्षणाचा त्यांना उपयोग होणार नाही हे ओळखून शिक्षक नारायण लोहार यांनी तिला अंधांच्या शाळेत जाण्याचा सल्ला दिला. वडील कुस्तीगीर पांडुरंग बाळू पवार यांनी लेकीच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्ल्या. तेजस्विनीने ब्रेल लिपीतून शिक्षण घेत दहावीला ८६.६० टक्के तर बारावीला ७६.३३ टक्के गुण मिळवून वेगळा ठसा उमटवला.

बारावीपर्यंत अंध शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषय निवडून ७८ गुण मिळवत प्रथम श्रेणीत बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. पुढे हिंदी विषयातून एमए केले. आपण काहीतरी वेगळे बनून दाखवायचे अशी उमेद मनात ठेवून तेजस्विनीने पुढे एमएससीआयटी, टायपिंग, इंग्लिश स्पिकिंगमध्ये यश संपादन केले.

उच्च शिक्षण घेतांना त्यांनी वाचक व लेखकांचा आधार घेतला. घरच्यांचे प्रोत्साहन व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे नुकतीच तिने बँक ऑफ इंडियात लिपिक पदावर झेप घेतली आहे. शिवाय ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षेतही यश मिळविले आहे. या दुहेरी यशामुळे तिचे जीवन तेजोमय झाले आहे. पुर्णतः अंध असताना घरच्यांपासून दूर राहून तिने मेहनतीच्या बळावर मिळवलेले हे यश नक्कीच भूषणावह आहे.

काेट

जीवनात आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीला शरण न जाता प्रत्येक विद्यार्थ्याने मनातील स्वप्नांसाठी पराकोटीचे प्रयत्न केल्यास कोणतेही अवघड यश सहज साध्य करता येते. यासाठी मनात इच्छाशक्ती ठासून भरलेली असावी

- तेजस्विनी पवार, जांभळेवाडी

Web Title: The ‘Dolas’ success of the blind Tejaswini of Jambhalewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.