सांगली जिल्ह्यात ‘डॉल्बी’वर फुली!
By admin | Published: July 19, 2016 11:04 PM2016-07-19T23:04:17+5:302016-07-19T23:52:19+5:30
दत्तात्रय शिंदे : उत्सवातून दणदणाट हद्दपार; पारंपरिक वाद्यांना पसंती द्यावी
सांगली : आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिराळ्यातील नागपंचमी तसेच लग्नसमारंभ याठिकाणी ‘डॉल्बी’लाऊन देणार नाही, असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. सण, उत्सव साजरा करण्यास पोलिसांचा विरोध नाही; पण ध्वनीप्रदूषणतेचे उल्लंघन करून कोणी कायदा हातात घेत असेल, तर पोलिस गप्प बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती द्यावी. जिल्ह्यातून डॉल्बीला हद्दपार करण्यासाठी प्रबोधन तसेच कारवाईची मोहीम उघडली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, मांगले (ता. शिराळ) येथे बेंदूर सणानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डॉल्बीचा वापर केला होता. पण प्रचंड दणदणाट चालू होता. पोलिसांचे पथक पाठवून डेसीबल मीटरमार्फत आवाजाची तपासणी केली. त्यावेळी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांसह डॉल्बी मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. येथून पुढील काळात शिराळ्याची नागपंचमी, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी लाऊ नये, यासाठी आतापासून आवाहन केले जात आहे. सण, उत्सव साजरा करण्यास पोलिसांचा विरोध नाही. यासाठी पारंपरिक वाद्यांना पसंती द्यावी. लोकांनी स्वत:हून डॉल्बीला प्रतिबंध करावा. डॉल्बीच्या आवाजाने जिल्ह्यात काहीजणांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. डॉल्बी लाऊन नृत्य केले जाते. यातून उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे.
शिंदे म्हणाले, लेझीम, झांजपथक, ढोल-ताशे या पारंपरिक वाद्यांमुळे उत्सवात एकजूटपणा दिसून येतो. यासाठी ही वाद्ये पर्यावरणाच्याद्दष्टीने महत्त्वाची आहेत. परंतु आजच्या पिढीला या वाद्यांचा विसर पडत चालला आहे. डॉल्बीच्या दणदणाटाचे अनेक दुरुपयोग आहेत. आजारी रुग्ण, लहान मुले यांना त्याचा प्रचंड त्रास होतो. पोलिसांकडे त्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात डॉल्बीचा दणदणाट होऊ देणार नाही. त्याची सुरुवात मांगले येथून केली आहे. शिराळकरांनाही नागपंचमीत पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात कडक भूमिका घेतली जाईल. डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा अन्यथा पोलिसांना नाईलाजास्तव कारवाई करावी लागेल. यासाठी प्रत्येक पोलिस ठाणेस्तरावर पथके नियुक्त केली आहेत. आवाजाची मर्यादा तपासणीसाठी डेसीबल मीटरही दिली आहेत. (प्रतिनिधी)
आवाजाची मर्यादा
शिंदे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा ७५, रात्री ७०, वाणिज्यिक क्षेत्रासाठी दिवसा ६५, रात्री ५५, निवासी क्षेत्रासाठी दिवसा ५५ रात्री ५४, तर शांतता क्षेत्रासाठी रात्री ५०, तर दिवसभरासाठी ४० डेसीबल आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. दिवसा म्हणजे सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत, रात्री म्हणजे रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत. रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय व सभोवतालच्या शंभर मीटरपर्यंतचे क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे.
पाच वर्षे कारावास
शिंदे म्हणाले, डॉल्बीचा दणदणाट ठेवून ध्वनी प्रदूषण मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या कायद्यांतर्गत संशयितांना पाच वर्षे कारावास व एक लाखाचा दंड होऊ शकतो. यावर्षी पोलिसांची डॉल्बीविरोधात जोरदार मोहीम असेल.