देशांतर्गत असणारे कलह रोखावेत

By admin | Published: August 29, 2016 12:20 AM2016-08-29T00:20:56+5:302016-08-29T00:20:56+5:30

सीताराम येचुरी : व्ही. वाय. पाटील अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रम

Domestic conflict prevents conflict | देशांतर्गत असणारे कलह रोखावेत

देशांतर्गत असणारे कलह रोखावेत

Next

कुंडल : देशात आजच्या घडीला बंधुत्वाचे नाते राहिले नसून, देशात एकमेकांविरोधातील वातावरण निर्माण झाले आहे. देशांतर्गत असणारे कलह रोखले तरच बाहेरून होणारे हल्ले रोखले जाणार असल्याचे प्रतिपादन डाव्या पुरोगामी चळवळीचे नेते खासदार सीताराम येचुरी यांनी केले. ते येथील अष्टेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित शेतकरी, कामगार, शेतमजूर, कष्टकरी यांच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते.
श्रमिकांचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी भारतीय किसान सभेचे अतुलकुमार अंजान, डॉ. अशोक ढवळे, क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, हुतात्मा समूहाचे वैभव नायकवडी, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद लाड यांच्यासह शिक्षण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते व्ही. वाय. पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला.
येचुरी म्हणाले, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात कुठे आहोत याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. आज पंतप्रधानांकडून दर आठवड्याला नवीन घोषवाक्य दिले जात असले तरी, देशात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. प्रगत महाराष्ट्रासारख्या विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढली आहे. काश्मीरमधील हिंसाचार पाकिस्तानमुळेच होत असला तरी, सरकारने तेथील तरूणांच्या अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुलकुमार अंजान म्हणाले, क्रांती कारखान्याच्या उभारणीमध्ये माझाही खारीचा वाटा आहे. भारताचे संविधान बदलून देशातील समस्या सुटणार नाहीत. जीएसटीचा सर्वात वाईट परिणाम हा फक्त शेतकऱ्यांवर होणार आहे.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, भारतातील जनता आजवर प्रत्येक आश्वासनाला बळी पडली आहे. कॉँग्रेसच्या राजवटीत सर्वात जास्त आत्महत्या झाल्या. येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य सरकार निवडून द्या.
यावेळी सर्वच वक्त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीवरही जोरदार टीका केली.
प्रा. बी. ए. पाटील यांनी स्वागत केले. क्रांती उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण लाड यांनी प्रास्ताविक केले. पी. व्ही. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)

 

Web Title: Domestic conflict prevents conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.