सांगली शहरात घरगुती गॅस पाईपलाईन कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 01:51 PM2019-10-30T13:51:24+5:302019-10-30T13:53:24+5:30
सांगली जिल्ह्याला पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सांगली-मिरज रस्त्याकडेला पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्र तसेच आष्टा-इस्लामपूरला पाईपद्वारे गॅस मिळेल. सांगली, साताऱ्याला भारत गॅस आणि कोल्हापूर जिल्ह्याला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी गॅस पुरवणार आहे. हा गॅस एलपीजीपेक्षा १० ते ४० टक्के स्वस्त व अत्यंत सुरक्षितही आहे.
संतोष भिसे
सांगली : जिल्ह्याला पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सांगली-मिरज रस्त्याकडेला पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्र तसेच आष्टा-इस्लामपूरला पाईपद्वारे गॅस मिळेल. सांगली, साताऱ्याला भारत गॅस आणि कोल्हापूर जिल्ह्याला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी गॅस पुरवणार आहे. हा गॅस एलपीजीपेक्षा १० ते ४० टक्के स्वस्त व अत्यंत सुरक्षितही आहे.
गेल (गॅस अॅथॉरिटी आॅफ इंडिया) कंपनीने सांगली व कोल्हापूरसाठी या दोन कंपन्या प्राधिकृत केल्या आहेत. पाईप अॅण्ड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाकडून नियंत्रण ठेवले जात आहे. दाभोळ बंदराजवळून दाभोळ-बेंगळुरू ही गेलची गॅस पाईपलाईन पुणे-बेंगळुरू महामार्गाजवळून गेली आहे. त्या पाईपलाईनला वाघवाडी फाट्यापासून सांगलीसाठी जोड दिला जाईल.
पेठ, इस्लामपूर, आष्टा व वाळवा शहरांना कव्हर करत सांगलीला येईल. महापालिका क्षेत्रात मागणीनुसार पुरवला जाईल. प्रत्येक कनेक्शनचे बिलिंग स्वतंत्र मीटरद्वारे निश्चित होईल. मीटर रिडिंग कर्मचाऱ्यांकडून तसेच डिजिटल स्वरुपातही होईल.
भारत गॅसने महापालिका क्षेत्रासह आष्टा, इस्लामपूर व वाळवा शहरातील लाभार्थी कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता असणाऱ्या घरांना गॅस मिळणार नाही, तो पक्क्या घरांनाच मिळेल. पारंपरिक सिलिंडरमध्ये द्रवरूप प्रोपेन व ब्युटेन असतो.
हवेपेक्षा जड असल्याने तो खालीच राहतो व स्फोटाचा धोका बळावतो. पाईपमधील गॅस मिथेन स्वरुपात व हवेपेक्षा हलका असतो. गळतीवेळी हवेत मिसळून जातो, त्यामुळे स्फोटाची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे सिलिंडरपेक्षा पाईपमधील गॅस सुरक्षित आहे. मेट्रो शहरांत सध्या तो घरोघरी मिळतो़, पण तेथे स्फोटाच्या घटना अत्यल्प आहेत. विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीपेक्षा दहा ते चाळीस टक्क्यांनी स्वस्त गॅस पाईपमधून मिळेल.
हेर्ले (जि. कोल्हापूर) येथील गेल कंपनीच्या गॅस स्टेशनमधून एक लाईन सांगलीसाठी व दुसरी साताऱ्यासाठी निघेल. सांगली-मिरज रस्त्यावर सध्या जमिनीखाली दीड मीटर खोलीवर पाईप पुरली जात आहे. गळती अजिबात होऊ नये यासाठी अत्यंत उच्च प्रतीच्या स्टीलची पाईप वापरली जात आहे.