काळू-बाळूच्या तमाशाला नवसाचं देणं : परंपरेची हलगी कडाडणार
By admin | Published: April 17, 2016 11:00 PM2016-04-17T23:00:50+5:302016-04-18T00:22:44+5:30
कवलापूर यात्रा कमिटीचा पुढाकार; कलाकारांची जुळवाजुळव सुरू--लोकमत विशेष
सचिन लाड-- सांगली--विनोदी भूमिका आणि अभिनयाने साऱ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणारा अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा यंदा दुष्काळामुळे बंद पडला. पण तमाशाची जन्मभूमी असलेल्या कवलापूर (ता. मिरज) येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेत त्यांची हलगी पुन्हा कडाडणार आहे. यात्रा कमिटीच्या पुढाकारामुळे बंद पडलेल्या या तमाशाला नवसाचं देणं लाभलं आहे. तमाशाचा सर्व खर्च यात्रा कमिटीने उचलला आहे. त्यानुसार कलाकारांची जुळवाजुळव व तमाशाची रंगीत तालीमही सुरु केली आहे. काळू-बाळू यांचे आजोबा सातू-हिरु यांनी तमाशाचा हा फड सुरु केला. त्यांची मुले शिवा-संभा यांनीही ही कला पुढे नेली. तमाशाची कला जोपासण्यासाठी ‘काळू-बाळू’ची चौथी पिढीही यातच उतरली. प्रकृतीअस्वास्थ्यामुळे दोन वर्षाच्या अंतराने ‘काळू-बाळू’ची जोडी पडद्याआड गेली. त्यांच्या पाचव्या पिढीनेही पुढे हीच कला जोपासली. तब्बल ५५ वर्षे तमाशा हेच दैवत मानून सांगली जिल्हा आणि कवलापूरचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणारा हा तमाशा, गेल्या दोन वर्षापासून आर्थिक संकटामुळे अडचणीत आहे.
प्रत्येकवर्षी विजयादशमीला हा फड बाहेर पडतो. तेथून ते मे महिन्यात अक्षय्यतृतीयेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सव्वादोनशे प्रयोग केले जातात. पण यंदा राज्यात दुष्काळ पडला आहे. त्यातच आर्थिक दुष्टचक्रात अडकलेला तमाशा चालणार नाही, असा विचार करुन यंदा फड बंद ठेवला आहे.
चैत्र महिन्यात हनुमान जयंतीला कवलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ होतो. यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे तमाशाचा फड सुरु करता आला नाही. तरीही गावातील सिद्धेश्वर मंदिरात देवासाठी नवसाचा खेळ करण्याच्या निमित्ताने तमाशा पुन्हा कवलापूरच्या मातीत बहरणार आहे. तमाशाचा प्रयोग होणार असल्याने यातील कलाकारांसह गावकऱ्यांमध्येही याचा आनंद दिसून येत आहे.
यात्रेच्या अभिमानाचा भाग
गुढीपाडव्याला यात्रा कमिटीची बैठक झाली. सरपंच प्रकाश माळी, उपसरपंच सचिन पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक निवासबापू पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे अध्यक्ष भानुदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील, माजी सरपंच जवान मोहिते, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेशअण्णा पाटील, राजू भगाटे आदी उपस्थित होते. यात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. यात्रेच्या चौथ्या व पाचव्यादिवशी गेल्या चार दशकाहून अधिक काळ ‘काळू-बाळू’ यांचा तमाशा होतो. तमाशा कलावंतही यादिवशी अन्य कोणतीही ‘सुपारी’ घेत नाहीत. पण यंदा त्यांचा तमाशा बंद असल्याने, करायचे काय? असा प्रश्न पडला. त्यावेळी यात्रा कमिटीने, गावाचा तमाशा असताना बाहेरचा तमाशा आणायचा नाही, असा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी ‘काळू-बाळू’ तमाशाचे संचालक संपत खाडे यांची भेट घेतली व तुमचा तमाशा सादर करा, अशी सूचना केली. खाडे यांनी कलाकारांची व आर्थिक समस्या मांडली. तरीही कमिटीने खर्चाची सर्व जबाबदारी उचलली. खाडेही तयार झाले. त्यामुळे तमाशाची राज्यातील परंपरा खंडित झाली असली तरी, कवलापूरच्या यात्रेतील परंपरा अखंडित राहिली आहे.
पन्नासभर कलाकार : सादरीकरणाचा लवाजमा
संपत खाडे यांनी गेल्या आठवड्यात कलाकारांची जुळवाजुळव केली. यासाठी त्यांना सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात फिरावे लागले. दोन दिवसांसाठी पगारावर पन्नास कलाकार आणले जाणार आहेत. याशिवाय त्यांच्या घरचे दहा कलाकार आहेत. या कलाकारांचा पगार, जेवण, जनरेटरची व्यवस्था यात्रा कमिटी करणार आहे. फडाकडे वाहन, स्टेज, ध्वनियंत्रणा व विद्युत रोषणाईची व्यवस्था आहे. फडाचे चार ट्रक आहेत. साहित्य नेण्यासाठी किमान तीन ट्रक लागतात. त्यामुळे या ट्रकचीही दुरुस्ती करुन आणण्यात आली आहे.
बुधगावकरांचे साकडे
हनुमान जयंतीला बुधगावच्या सिद्धेश्वर यात्रेलाही प्रारंभ होतो. ‘काळू-बाळू’चा तमाशा कवलापूरच्या यात्रेत होणार असल्याचे बुधगावच्या यात्रा कमिटीला समजले. कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी संपत खाडे यांची भेट घेऊन बुधगावलाही तमाशा करण्याची विनंती केली. पण खाडे यांनी हे शक्य नसल्याचे सांगितले.
दुष्काळामुळे यंदा तमाशा सुरु ठेवणे परवडणारे नव्हते. त्यामुळे फड बंद ठेवला. कवलापूर आमची जन्मभूमी आहे. येथे यात्रेत तमाशा करण्याची कित्येक वर्षांची परंपरा आहे. यात एक आमचा नवसाचा खेळ असतो. ही परंपरा खंडित होते की काय, अशी भीती होती. पण यात्रा कमिटी मदतीला धावली. त्यामुळे आम्ही केवळ यात्रेपुरते दोन दिवस खेळ करणार आहोत.
- संपत खाडे, संचालक, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा, कवलापूर