पाणीप्रश्नी सांगलीत दलित महासंघाचा गाढव मोर्चा, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर संताप
By अविनाश कोळी | Published: January 30, 2024 03:50 PM2024-01-30T15:50:08+5:302024-01-30T15:51:35+5:30
महापालिका क्षेत्रातील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिक संतप्त
सांगली : महापालिका क्षेत्रातील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर संताप व्यक्त करीत दलित महासंघाच्या वतीने मंगळवारी पाणीपुरवठा विभागावर गाढवांसहीत मोर्चा काढण्यात आला. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली.
दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हिराबाग वॉटर वर्क्स येथे मोर्चा काढत निदर्शने केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका स्थापन होऊन २५ वर्षे झाली तरी नदीकाठी असणाऱ्या शहरात शुद्ध व पुरेशा पाण्याचा पुरवठा करु शकली नाही. शहरातील अनेक भागात अळ्यामिश्रीत तसेच दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काहीठिकाणी जलवाहिन्यांना गळती असल्याने त्यातून सांडपाणी मिसळत आहे. महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुधारला नाही, तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
आंदोलनात महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख उत्तम मोहिते, जिल्हाध्यक्षा वनिता कांबळे, रमेश चोगुले, महेश देवकुळे, सचिन मोरे, अजित आवळे, महेश देवकुळे, महावीर चंदनशिवे, तेजस मोरे, सागर कांबळे, शरद शिंदे, शंकर माने, अर्जुन मोरे, रामचंद्र वारे, प्रविण वारे, राहुल वारे, सोनाली मोहिते, वैभव कोले आदी सहभागी होते.