"गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगेंच्या आरेवाडीतील मेळाव्यास परवानगी देवू नका"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 01:57 PM2022-09-30T13:57:19+5:302022-09-30T13:57:55+5:30
ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टने दोन्ही मेळाव्याला परवानगी नाकारावी असा ठराव केला
ढालगाव : आरेवाडी ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाच्या बनात दसऱ्याच्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन केले आहे. या दोन्ही मेळाव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टने दोन्ही मेळाव्याला परवानगी नाकारावी, असा ठराव केला आहे. तसेच पोलीस उपअधीक्षकांनाही परवानगी न देण्याबाबत विनंती केली आहे.
बिरोबा बनातील भक्त निवास येथे पत्रकार बैठक घेऊन ही माहिती देण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल कोळेकर, माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, सरपंच आबासाहेब साबळे, उपसरपंच बिरू कोळेकर आदींसह विश्वस्त उपस्थित होते.
आरेवाडी येथील बिरोबा बनात २ रोजी दसरा मेळावा घेण्यासाठी रावसाहेब कोळेकर यांनी २२ सप्टेंबर रोजी अर्ज केला होता. सरपंच व ग्रामसेवकांनी मेळाव्यास परवानगी दिली होती. त्यानंतर २५ रोजी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही त्याच दिवशी दसरा मेळावा घेण्यास परवानगी मागितली. एकाच दिवशी, एकाच वेळी दोन्ही पक्षांनी परवानगी मागितल्याने ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान समितीसमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टने बहुमताने ठराव घेऊन दोघांनाही मेळाव्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे केली आहे.