कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेच आला म्हणून ॲप डाऊनलोड करु नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:37+5:302021-07-25T04:22:37+5:30
अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : बँकांच्या अटी, कागदपत्रे व अन्य प्रक्रिया टाळण्यासाठी ऑनलाईन झटपट कर्जाकडे लोक आकर्षित ...
अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बँकांच्या अटी, कागदपत्रे व अन्य प्रक्रिया टाळण्यासाठी ऑनलाईन झटपट कर्जाकडे लोक आकर्षित होत आहेत. मोबाईलवर यासाठी आलेले मेसेज पाहून संबंधित ॲप डाऊनलोड केल्यानंतर संबंधितांच्या खात्यावरुन पैसे लुटले जात आहेत. त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. तातडीने व ऑनलाईन कर्ज उपलब्ध करण्याचे आमिष दाखविणारे मेसेज अनेकांच्या मोबाईलवर सतत पडत असतात. ज्यांना अशा फेक ॲपची कल्पना आहे, ते त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मसेज डिलीट करतात. मात्र, ज्यांना याची माहिती नाही किंवा कर्जाची नितांत गरज आहे, असे लोक याला बळी पडतात. मेसेजमधील लिंक ओपन करुन ॲप डाऊनलोड करतात आणि त्यांचा व्यक्तिगत सर्व डाटा अशा गुन्हेगारांच्या हाती लागतो. त्यानंतर ॲप डाऊनलोड केलेल्या व्यक्तीच्या खात्यावरुन पैसे गायब होतात.
चौकट
ॲप डाऊनलोड करताच बँक खाते साफ
मेसेजवरील लिंकच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड केल्यानंतर हे ॲप तुमच्याकडून काही परवानग्या मागते. तुम्ही एक्सेप्ट बटन दाबले म्हणजेच मान्य केले तर तुमची सर्व माहिती त्या सायबर चोराला मिळते. तुम्ही त्याला परवानग्या दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवरील ऑनलाईन पेमेंटचा डाटाही तो चोरुन घेतो. ॲपच्या आधारावर चोरलेल्या माहितीच्या आधारे सायबर चोर तुमचे खाते लागलीच साफ करतो.
चौकट
याप्रमाणे तुम्हीही फसू शकता
प्रकरण १
मिरजेतील बोलवाड येथील सचिन बरगाले या व्यक्तीला ऑनलाईन कर्ज देण्याच्या आमिषाने जानेवारी २०२१मध्ये १ लाख ८ हजार रुपयांना फसविले गेले. ऑनलाईन कर्जाचाच हा प्रकार असला, तरी त्यात ॲपचा प्रकार नव्हता. मंजुरीच्या आमिषाने संबंधित कंपनीने ऑनलाईन पैशांची मागणी केली होती. त्यातून ही फसवणूक झाली होती. फसविणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले.
प्रकरण २
हैद्राबाद येथे ऑनलाईन कर्जाचे ॲप चालवून फसविणाऱ्या २१ जणांच्या टोळीला मार्च २०२१मध्ये अटक केली होती. विविध राज्यांत त्यांनी ३०० कोटी रुपये लुटल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे या आंतरराज्य टोळीपासून प्रत्येकाने सावध राहावे.
चौकट
या गोष्टींपासून रहा सावध
मोबाईलवर ऑनलाईन कर्जाबद्दल ऑफर देणारा मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष करा.
नामांकित बँकेच्या नावाने मेसेज आला तर त्या बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून खातरजमा करा.
कोणत्याही अनोळखी लिंकवर, ॲपवर, क्यूआर कोडवर क्लिक करु नका.
कोट
आमिषाला बळी नका पडू
ऑनलाईन कर्जाच्या आमिषाला बळी पडू नये. ॲप, लिंक, क्यू-आर कोड यापासूनही दूर राहावे. आपल्या खात्याची किंवा मोबाईलची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू नये, याबाबत प्रत्येकाने सतर्क राहावे.
- संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम सेल