गर्भवतीला ग्रहण पाळण्याची सक्ती करू नका, अंनिस आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:44 PM2022-10-25T12:44:44+5:302022-10-25T12:46:29+5:30
ग्रहणकाळात गर्भवतीला अंधाऱ्या खोलीत बसवून ठेवणे, तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
सांगली : ऐन दिवाळीत मंगळवारी (दि. २५) सायंकाळी साडेचार वाजता खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्याचा ३६ टक्के भाग झाकला जाणार आहे. हे ग्रहण अशुभ नसल्याने गरोदर महिलांनी पाळण्याची गरज नाही अशी स्पष्टोक्ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. सांगली मिरज स्रीरोगतज्ज्ञ संघटनेनेही दुजोरा दिला आहे.
संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, ग्रहणासारख्या एका सुंदर खगोलीय घटनेला अशुभ मानणे चुकीचे आहे. ग्रहणकाळात कोणतीही हानिकारक किरणे निघत नाहीत. अन्न, पाणी दूषित होत नाही. ग्रहणकाळात गर्भवतीला अंधाऱ्या खोलीत बसवून ठेवणे, तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ग्रहणात गर्भवतीने काम केल्यास बाळाचे ओठ फाटतात, याला कोणताही वैद्यकीय आधार नाही.
जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गर्भामध्ये व्यंग
मानवी गर्भाचा विकास आठव्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालेला असतो. अनुवंशिकतेने, गुणसूत्रांच्या दोषांमुळे, चुकीची औषधे खाल्ल्याने किंवा ब जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गर्भामध्ये व्यंग तयार होतात. तिसऱ्या व पाचव्या महिन्यातील सोनोग्राफीमध्ये काही दोष दिसले नाहीत, तर घाबरण्याचे कारण नाही. त्यामुळे गर्भवतीला ग्रहण पाळण्याची सक्ती करू नका, असे आवाहन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मोनिका कल्लोळी, सचिव डॉ. कांचन जोशी यांनी केले आहे.