आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणासाठी गिनी पीग बनवू नका! मनात शंकेचे काहूर !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:35+5:302021-01-08T05:24:35+5:30
सांगली : कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्स तथा डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. पण घेण्याविषयी दुमत ...
सांगली : कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्स तथा डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. पण घेण्याविषयी दुमत असल्याचे आढळून येत आहे. लसीचे नेमके दुष्परिणाम अद्याप स्पष्ट झालेले नाहीत, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात तिचा विचार करु अशीच भूमिका आढळत आहे.
सध्या शासनाच्या संकेतस्स्थळावर व ॲप्लीकेशनद्वारे लसीकरणासाठी नोंदणी सुरु आहे. शासकीय नोंदणी बहुतांश झाली असली तरी खासगी नोंदणी मागे पडली आहे. लस घेणे ऐच्च्छिक असल्याने खासगी डॉक्टर्स व कर्मचारी नोंदणीसाठी पुढे आलेले नाही. खासगी डॉक्टरांच्या एका संघटनेतील अडीच हजार सदस्यांपैकी सुमारे ७० टक्क्यांनी नोंदणीच केलेली नाही.
पहिल्या टप्प्यात लसीकरण झाल्यानंतर तिचे परिणाम पाहू, चांगली असले तर प्रसंगी खासगी लस विकत घेऊ अशी त्यांची भूमिका आहे. खासगी डॉक्टरांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये लसीच्या परिणामकारकतेविषयी तज्ञांची मते समजत आहेत, त्यातूनही लस पहिल्या टप्प्यात न घेण्याविषयी मानसिकता बळावत आहे. बाजारात पाच ते सहा कंपन्यांच्या खासगी लसी असल्याने सरकारी लस लगेच घेण्याची गरज नाही असा डॉक्टरांचा सूर आहे.
सरकारी डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांतही लसीविषयी साशंकता आहे. नोंदणी टाळणे शक्य नसल्याने पोर्टलवर ती केली गेली आहे, पण त्यातील सर्वचजण लस घेतील याची शाश्वती नाही. सध्या जिल्हाभरात कोरोनाचे रुग्ण शून्यापयर्यंत येत असल्याने लसीची गरज काय अशीही त्यांची भूमिका आहे.
कोराना लस शंभर टक्के शास्त्रोक्त परीक्षणानंतरच लसीकरणासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे डॉक्टर्स किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. अनेक वेगवेगळ्या टप्प्यांत काटेकोर चाचण्या करुनच लस सिध्द झाली आहे. जगभरातही त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत, त्यामुळे लसीकरण उपयुक्त आहे.
- डॉ. श्रीनिकेतन काळे, सचिव, आयएमए
लसीकरणाच्या नोंदीला प्रतिसाद चांगला आहे. सर्व डॉक्टर्स व कर्मचारी लस घेण्यास उत्सुक आहेत, किंबहुना लसीची वाट पाहताहेत. कोरोनावर लस परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण केले जाईल. प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.
- डॉ. मिलींद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी
संभाव्य दुष्परिणांची कोण जबाबदारी घेणार?
भारतात वापरल्या जाणाऱ्या लसीची परिणामकारकता ७० टक्क्यांपयर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे, उर्वरीत तीस टक्क्यांमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांना तोंड कसे द्यायचे असा प्रश्न आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. शंभर टक्के सिध्द करुनच ती द्यावी असा सूर डॉक्टर व कर्मचाऱ्यांत दिसून येत आहे.
-------------