दीड हजारासाठी महाराष्ट्र मोदींकडे गहाण ठेवू नका, मल्लिकार्जुन खरगे यांचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:55 AM2024-09-06T11:55:45+5:302024-09-06T11:56:55+5:30

राज्यातील जनतेने स्वाभिमान जपायला हवा

Don't mortgage Maharashtra's pride to Narendra Modi for Rs.1500 says Congress National President Mallikarjun Kharge | दीड हजारासाठी महाराष्ट्र मोदींकडे गहाण ठेवू नका, मल्लिकार्जुन खरगे यांचे जनतेला आवाहन

दीड हजारासाठी महाराष्ट्र मोदींकडे गहाण ठेवू नका, मल्लिकार्जुन खरगे यांचे जनतेला आवाहन

सांगली : मते मिळविण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेचे आमिष दाखविले जात आहे. जनतेने दीड ते दोन हजार रुपयांसाठी नरेंद्र मोदींकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवू नये. त्यांच्या पैशाला ठोकर मारून संविधान संपवू पाहणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.

कडेगाव येथे दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. व्यासपीठावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वेडेट्टीवार, खासदार प्रणिती शिंदे, खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, मोहनराव कदम आदी उपस्थित होते.

खरगे म्हणाले, लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून दिले. आता विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनतेने अशीच साथ द्यायला हवी. महाराष्ट्र जिंकला तर देश जिंकल्यासारखे आहे. भाजपचे सध्याचे सरकार हे लोकांनी निवडून दिलेले नाही. त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडून सरकार आणले आहे. नकली पक्ष त्यांच्याकडे, तर मूळ व खरे पक्ष आमच्याकडे आहेत.

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार व शिक्षण संस्थांचा वाटा मोठा आहे. भाजपला राजकीय फायद्यासाठी या संस्था संपवायच्या आहेत. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्याकडे सहकार खाते घेतले आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही राजकारण

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही इमारतीचे, पुतळ्याचे घाईगडबडीत उद्घाटन करण्यात मोदी धन्यता मानत आहेत. त्यामुळेच त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले पूल, पुतळे कोसळत आहेत. राममंदिरच्या छतालाही आता गळती लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाही गडबड झाली आहे. त्यातूनच पुतळा कोसळला. महाराष्ट्रातील शिल्पकारांनी साकारले अनेक पुतळे संसदेत दिमाखात ५० वर्षांहून अधिक काळ उभे असताना मालवणचा पुतळा कसा पडला? असा सवाल खरगे यांनी केला.

मोदींपेक्षा विश्वजित यांची ताकद अधिक

लोकसभेच्या वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींना जितके मताधिक्य मिळाले तेवढेच मताधिक्य एका विधानसभा मतदारसंघातून विश्वजित कदम यांना मिळाले आहे. त्यावरून त्यांची ताकद दिसून येते, असे मत खरगे यांनी व्यक्त केले.

संविधान संपवायचा डाव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक शासनाच्या प्रत्येक विभागात शिरले आहेत. त्यांना संविधान संपवायचे आहे. अभ्यासक्रम बदलण्याचा डावही त्यांनी आखला आहे, अशी टीका खरगे यांनी केली.

Web Title: Don't mortgage Maharashtra's pride to Narendra Modi for Rs.1500 says Congress National President Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.