शेतकऱ्यांना लुटून 'दत्त इंडिया' चालवू नका, अन्यथा..; राजू शेट्टींनी दिला इशारा
By अशोक डोंबाळे | Published: November 4, 2023 06:03 PM2023-11-04T18:03:59+5:302023-11-04T18:05:16+5:30
इथेनॉल निर्मिती बंद करुन केंद्रावर दबाव टाका
सांगली : येथील दत्त इंडियाचे व्यवस्थापन पैसे मिळविण्यासाठीच इथे आले आहे. शेतकऱ्यांना लुटून वसंतदादा साखर कारखाना चालविण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना गतवर्षीच्या गळीत हंगामास गेलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये हप्ता मिळालाच पाहिजे. मागील गळिताचा हिशोब द्या, अन्यथा कारखाना बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जन आक्रोश पदयात्रा शनिवारी सकाळी वसगडे (ता. पलूस), नांद्रे कर्नाल मार्गे मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे आली. पदयात्रेचे अनेक गावांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. नांद्रे, मौजे डिग्रज, कर्नाळमध्ये जन आक्रोश पदयात्रेवर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आयोजित सभेत माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. यावेळी दत्त इंडियाचे व्यवस्थापक शरद मोरे यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. राजू शेट्टी पुढे म्हणाले, कारखानदार नफ्यातील वाटा द्यायला तयार नाहीत.
मात्र, गेल्या वर्षीचे ४०० रुपये घेतल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखरेचा भाव वाढला आहे. त्यामुळे कारखानदारांना ज्यादाचे जे पैसे मिळाले आहेत, त्यातील ४०० रुपये आम्ही मागत आहोत. त्यामुळे तत्काळ ४०० रुपये द्यावेत, यंदाचा योग्य दर जाहीर करावा, अन्यथा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, श्रीपाल चौगुले, अजित लांडे, कुमार पाटील आदी उपस्थित होते.
इथेनॉल निर्मिती बंद करुन केंद्रावर दबाव टाका
साखर कारखान्यांनी उत्पादीत केलेल्या इथेनॉलवर कोणतीही प्रक्रीया न करता केंद्र शासन पेट्रोलमध्ये मिसळत आहे. त्या इथेनॉलला प्रति लिटर ४९ रुपये केंद्र शासन देत असून तेच पेट्रोल १०६ रुपये लिटरने ग्राहकांना विक्री होत आहे. एवढी मोठी तफावत केंद्र शासनाने कशासाठी ठेवली आहे. इथेनॉलचे दर वाढविण्यासाठी केंद्र शासनावर साखर कारखानदारांनी दबाव टाकला पाहिजे. यासाठी कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन बंद करावे, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले