शर्यती रंगल्या... धुरळा उडाला, बैलजोड्यांनी लुटली बक्षिसे; रेठरे व पुण्याच्या जोडीने पटकावली ‘थार’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:10 PM2023-04-10T17:10:17+5:302023-04-10T17:10:33+5:30
शर्यतीत सहभागी झालेल्या प्रत्येक बैलगाडीस रुस्तुम-ए-हिंद हे चषक, प्रत्येकी सहा टी-शर्ट व टोप्या देण्यात आल्या
विटा : शाैकिनांच्या विक्रमी गर्दीने फुललेले भाळवणी (ता. खानापूर) येथील माळरान... टाळ्या अन् शिट्यांचा जल्लोष... शिगेला पोहोचलेली उत्सुकता, अशा वातावरणात देशातील सर्वांत मोठ्या बैलगाडी शर्यतींनी धुरळा उडविला. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या बैलजोड्यांनी या शर्यतीत बक्षिसांची लयलूट केली. १३३ बैलगाड्यांमधून रेठरे व पुण्याच्या बैलजोडीने विजेतेपद पटकावीत महिंद्रा थार गाडी जिंकली.
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या या शर्यतीला मोठा प्रतिसाद लाभला. राज्यभरातील १३३ बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. यात रेठरे (ता. कराड) येथील सदाभाऊ कदम यांच्या महिब्या व मुळशी (पुणे)च्या बकासूर या बैलांनी निकाल पट्टीवर अंतिम झेप घेत महिंद्रा ‘थार’ जिंकली. यावेळी उपस्थित लाखो प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
भाळवणी येथील मुल्लानगरच्या विस्तीर्ण माळरानावर पै. चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त शर्यती पार पडल्या. रविवारी सकाळी ११ वाजता मैदानाचे उद्घाटन पै. चंद्रहार पाटील व त्यांचे वडील सुभाष पाटील यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून करण्यात आले.
शर्यतीत पाच स्पर्धकांप्रमाणे एकूण २७ गट पाडण्यात आले होते. गट नं. २६ व २७ मध्ये प्रत्येकी चार बैलगाड्या सोडण्यात आल्या.
सेमी फायनलमधून निवडलेल्या बैलगाड्या अंतिम स्पर्धेसाठी सोडण्यात आल्या. शर्यतीत दुसरा क्रमांक आरोही दडगे (नांदेड) यांच्या आणि तिसरा क्रमांक गुड्डी रतन म्हात्रे (डोंबिवली) यांच्या बैलगाडीला मिळाला. त्यांना प्रत्येकी ट्रॅक्टर व चषक, असे बक्षीस देण्यात आले. चौथा क्रमांक निसर्ग गार्डन (कात्रज, पुणे), तर पाचवा क्रमांक नियती बुधकर (रामोसवाडी, जि. सातारा) यांच्या बैलगाडीने पटकाविला. या दोन्ही बैलगाडी मालकांनाही प्रत्येकी मोटारसायकल व चषक देण्यात आले. सहाव्या क्रमांकाचे स्कूटीचे बक्षीस गोट्याराव तडसर व रघुवीर (कल्याण) यांच्या संयुक्त बैलगाडीने पटकाविले.
रविवारी रात्री खासदार श्रीनिवास पाटील व आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी पै. चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या शर्यतीचे आ. जयंत पाटील यांनी कौतुक करून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगली जिल्ह्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
शर्यतीवेळी खासदार संजय पाटील, आ. अनिल बाबर, आ. डॉ. विश्वजित कदम, आ. अरुण लाड, माजी आमदार सदाशिवराव पाटील, पृथ्वीराज देशमुख, वैभव पाटील, सुहास बाबर, आयुक्त सचिन मोटे, रोहित पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी दिल्या. प्रेक्षकांचे आभार मानून पै. चंद्रहार पाटील यांनी सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेऊन विजेत्यास एक कोटीचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले.
शर्यतीसाठी ४५० मीटरचे अंतर
शर्यतीत बैलांना धावण्यासाठी अंदाजे ४५० मीटरचे अंतर ठेवण्यात आले होते. मैदानावर लावण्यात आलेले ‘जसं ठरलयं.. तसंच केलंय’ आणि ‘उद्देश एकच.. गोवंश संवर्धन’ या दोन फलकांसह पै. चंद्रहार पाटील यांच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा घेतलेले कटाउट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते.
प्रत्येक बैलगाडीला चषक...
या शर्यतीत सहभागी झालेल्या प्रत्येक बैलगाडीस रुस्तुम-ए-हिंद हे चषक, प्रत्येकी सहा टी-शर्ट व टोप्या देण्यात आल्या. शर्यतीचे नेटके नियोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारण्यात आली होती.