चॅटिंगच्या वादातून उमदीत दुहेरी खून, टोळीयुद्धाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 11:00 AM2022-03-09T11:00:01+5:302022-03-10T17:59:15+5:30

मोबाईल स्टेटसवरती फोटो ठेवल्याच्या कारणातून दोन गटात अनेक दिवसांपासून वाद

Double murder at Umadi in Jat taluka | चॅटिंगच्या वादातून उमदीत दुहेरी खून, टोळीयुद्धाची चर्चा

चॅटिंगच्या वादातून उमदीत दुहेरी खून, टोळीयुद्धाची चर्चा

googlenewsNext

संख : उमदी (ता. जत) येथे सोशल मीडियावरील चॅटिंगच्या रागातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत दोन तरुणांचा निर्घृण खून करण्यात आला. आणखी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हाणामारीत काठ्या, धारदार शस्त्र व दगडांचा वापर करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराला घडली. उमदी पोलिसांनी १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

गुंडू ऊर्फ मदगोंडा नागाप्पा बगली (वय २१), संतोष राजकुमार माळी (२१, दोघे रा. उमदी) अशी मृतांची नावे आहेत. प्रकाश महादेव परगोंड (वय २१) हा गंभीर जखमी झाला आहे.

उमदीत शिवजयंती दिवशी व्यासपीठावर बसण्याच्या कारणावरून सोशल मीडियावर चॅटिंग सुरू झाले होते. त्यातून दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा दुसऱ्या गटातील संशयित व मदगोंडा बगली, संतोष माळी यांच्यात वाद झाला होता. स्थानिक नेते व पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. रात्री पंढरपूर रस्त्यावरील मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवरील ढाब्यावर मदगोंडा बगली मित्रांसह जेवायला गेला होता.

तेथून परत येत असताना संशयितांनी त्यांच्यावर काठ्या, धारदार शस्त्र व दगडाने हल्ला केला. यात मदगोंडा, संतोष व प्रकाश गंभीर जखमी झाले होते. माहिती मिळताच नातेवाईकांनी व उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांना उपचारासाठी सोलापूरला हलवले. मात्र वाटेतच मदगोंडा आणि संतोष यांचा मृत्यू झाला. प्रकाशला सोलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथे पाठविले. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपविभागीय अधिकारी डॉ. रत्नाकर नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, प्रशांत निशाणदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

आठवड्यापूर्वी सुटीवर

मृत संतोष माळी उदगीर येथे बीएस्सी (ॲग्री.)च्या तिसऱ्या वर्षाला होता. सत्र संपल्याने आठ दिवसांपूर्वी सुटीवर तो गावी आला होता. मित्राबरोबर जेवायला गेला होता; पण अचानक घडलेल्या हाणामारीच्या घटनेत त्याचा नाहक बळी गेला.

टोळीयुद्धाची चर्चा

काही महिन्यांपासून तालुक्यातील एका टोळीचा म्होरक्या उमदीतील साथीदारांसह परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हातात तलवारी घेऊन फिरत होता. त्याच्यावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. दुहेरी खुनाला त्याची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे.

Web Title: Double murder at Umadi in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.