मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे २१३ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण

By अशोक डोंबाळे | Published: February 24, 2024 04:40 PM2024-02-24T16:40:57+5:302024-02-24T16:41:38+5:30

सातारा ते कऱ्हाडदरम्यान १८ किलोमीटर लांबीची चाचणी पूर्ण, येत्या वर्षभरात उर्वरित ६७ किलोमीटरचे दुहेरीकरण होणार

Doubling of 213 km Miraj Pune railway line completed | मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे २१३ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण

मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे २१३ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण

मिरज : सातारा ते कऱ्हाडदरम्यान तारगाव-मसूर-शिरवडे दरम्यान १८ किलाेमीटर लांबीच्या दुहेरीकरणाची चाचणी पूर्ण झाल्याने मिरज-पुणेरेल्वे मार्गाचे २१३ किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

मध्य रेल्वेने मिरज-पुणे या २८० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम २०१६ मध्ये सुरू केले. मे २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. जुन्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले; मात्र सातारा व पुणे जिल्ह्यात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या हरकती व इतर अडचणींमुळे दुहेरीकरणाच्या कामास वर्षभराचा विलंब झाला. तारगाव-मसूर व मसूर-शिरवडे अशा दोन टप्प्यातील १८ किलाेमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने शिरवडे ते तारगाव दरम्यान वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त १३१ किलाेमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलाेमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे. टप्प्याटप्प्याने हा वेग ११० किलाेमीटर प्रतितास होणार आहे. 

कऱ्हाड ते सांगली दरम्यान सुमारे ४० किलाेमीटर दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. तारगाव ते शिरवडे हा १८ किलाेमीटर मार्ग सुरू झाल्याने पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या २८० किलाेमीटरपैकी २१३ किलाेमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तयार झालेल्या २१३ किलाेमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. उर्वरित ६७ किलाेमीटर दुहेरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससह अन्य जादा रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत.

Web Title: Doubling of 213 km Miraj Pune railway line completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.