Sangli: चांदोली येथील प्राणी गणनेबाबत उदासीनता; सागरेश्वर, राधानगरी अभयारण्यात मात्र होणार गणना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:57 PM2024-05-13T12:57:09+5:302024-05-13T12:57:51+5:30
वनविभाग अद्याप संभ्रमात
आनंदा सुतार
वारणावती : अभयारण्यातील वनक्षेत्रातील प्राण्यांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागामार्फत दरवर्षी सर्वाधिक प्रकाश असलेल्या रात्री म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच विष्ठा आणि ठशांचा अभ्यास करून वन्य प्राण्यांची गणना केली जाते. पण, यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणारी प्राणी गणना होणार की नाही याबाबत शंका बळावत आहे.
यंदाच्या प्राणी गणनेबाबत वन विभागाची उदासीनता असल्याची चर्चा प्राणीमित्र व नागरिकांतून चांदोली परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. याचे कारण असे बुद्ध पौर्णिमेच्या अगोदर आठ ते पंधरा दिवस वन विभागामार्फत प्राणी गणनेस येणाऱ्या प्राणी मित्रांची नावे नोंदवली जातात. त्यांना वन अधिकाऱ्यांबरोबर अभयारण्यात प्राणी गणनेसाठी घेऊन गेले जाते.
व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात झालेली विभागणी तसेच, अधिकाऱ्यांची कर्तव्यातील चालढकल या गोष्टींच्या अभावाने चांदोलीत २२ व २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणी गणना थांबणार की काय? अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यालयाकडून मिळाली.
वनविभाग अद्याप संभ्रमात
मागील चार दिवसांपासून कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोलीस्थित उप विभागीय वन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, कार्यालयातून कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसून दोन दिवसांत काही माहिती मिळाल्यास कळवले जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होणार असल्याची माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.