सांगलीत सात आमदारांसह डझनभर नेते कोरोनाबाधित, रोहित पाटलांनाही लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 02:56 PM2020-09-06T14:56:06+5:302020-09-06T15:00:14+5:30
राजकीय क्षेत्राला दंश : सर्वपक्षीय कार्यकर्ते झाले अलर्ट
सांगली : शासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह आता राजकीय क्षेत्रालाही कोरोनाचा दंश झाला आहे. जिल्ह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय सक्रीय कार्यकर्ते कोरोना संसर्गाबाबत अधिक काळजी घेऊ लागले आहेत.
जिल्ह्यात आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. विक्रम सावंत, आ. मोहनराव कदम, आ. सदाभाऊ खोत, आ. सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत.
याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील हेसुद्धा बाधित झाले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्राला कोरोनाने कवेत घेतल्याचे चित्र दिसत आहे. अनेक कार्यकर्तेही पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सांगलीत कोरोनाच्या संकटकाळात मास्क, सॅनिटायझर, औषध वाटप करण्यासाठी राजकीय नेते व कार्यकर्ते काम करीत आहेत. पक्षांच्या बैठका, आंदोलने, शासकीय नियोजन बैठका यांना ते उपस्थितही रहात होते. या कार्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचे काम ते करीत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. या नेत्यांबरोबर काही कार्यकर्तेही बाधित झाले असल्याने राजकीय क्षेत्र सध्या क्वारंटाईन झाल्याच्या स्थितीत आहे.
मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे हे कोरोनामुक्त झाले असून आणखी काही दिवस त्यांना घरातच विलगीकरण करून घ्यावे लागणार आहे. काही राजकीय नेत्यांसह त्यांचे कुटुंबिय, वाहनचालक, कार्यकर्ते यांनाही संसर्ग झाला आहे. कोरोना काळात अद्यापही राजकीर व सामाजिक कार्यकर्ते सक्रीय असले तरी नेते कोरोनाबाधित होत असल्याने त्यांनी अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय क्षेत्रातील बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. सांगलीतील माजी महापौर हारुण शिकलगार यांचा मृत्यूसुद्धा अनेकांना धक्का देऊन गेला. त्यामुळे सांगलीचे राजकीय क्षेत्रसुद्धा आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याचे दिसत आहे.