डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या; जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनात ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:35 PM2024-12-02T13:35:34+5:302024-12-02T13:36:33+5:30
जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशन सहा ठराव, महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या टीव्ही मालिका ताबडतोब बंद कराव्यात
सांगली : ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या आणि कुटुंबातील वातावरण बिघडविणाऱ्या टीव्ही मालिका ताबडतोब बंद कराव्यात, असे सहा प्रमुख ठराव जिजाऊ ब्रिगेडच्या ७व्या राज्य अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
हरीपूर (ता. मिरज) येथे जिजाऊ ब्रिगेडच्या ७व्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अश्विनीताई घोरपडे यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वप्नाली विश्वजित कदम, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय घोगरे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शैलजा पाटील, विजया पृथ्वीराज पाटील, हरीपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर, प्रियांकादेवी घोरपडे, डॉ. संजय पाटील यांची उपस्थिती होती.
या अधिवेशनातील ठराव
- ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा.
- पाचाड येथे जिजाऊंचे भव्य स्मारक व ऐतिहासिक घटनांच्या कलादालनासाठी शासनाने ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी.
- महिलांसाठी प्रत्येक तालुक्यात मोफत कायदेविषयक सल्ला व उद्योग मार्गदर्शन केंद्र सुरू करावे.
- विधवांची आभूषणे न काढता योग्य सन्मानासाठी शासनाने निर्णय घ्यावा. प्रत्येक गावात कार्यवाहीसाठी ग्रामपंचायतींना निर्देश द्यावेत.
- प्रत्येक जिल्ह्यात १०० कोटी रुपयांचे राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह उभारावे.
- महिलांचे चारित्र्यहनन करणाऱ्या आणि कुटुंबातील वातावरण बिघडविणाऱ्या टीव्ही मालिका ताबडतोब बंद कराव्यात.
मालिका पाहून कुटुंबात बिघाड नको
डॉ. अश्विनी घोरपडे म्हणाल्या, टीव्हीवरील मालिकांमध्ये कौटुंबिक कारस्थानांचा भडिमार केला जातो. भारतीय कुटुंबांमध्ये फक्त कारस्थानेच चालतात का, असा प्रश्न पडतो. टीव्हीवरील मालिका पाहून कुटुंबात बिघाड होऊ नये. जिजाऊंच्या काळात टीव्ही नसतानाही त्यांनी स्वराज्याच्या उभारणीत प्रभावी भूमिका बजावली.
वाढदिवसाला केक कशासाठी?
डॉ. घोरपडे म्हणाल्या, वाढदिवसाला केक कापणे, मेणबत्त्या लावणे, रिटर्न गिफ्टची अपेक्षा करणे ही आपली संस्कृती नाही. इंग्रज साहेबाची संस्कृती त्याच्याबरोबरच गेली. आता आपली संस्कृती टिकवली पाहिजे.