डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना: नवीन विहिरीसाठी अडीच लाख, सांगलीतील शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी

By अशोक डोंबाळे | Published: September 5, 2024 07:02 PM2024-09-05T19:02:24+5:302024-09-05T19:03:40+5:30

सांगली : नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्याबरोबरच राज्याचा आर्थिक कणा असलेला बळीराजा अधिक सक्षम होण्यासाठी राज्यशासन विविध योजना राबवत असते. राज्य ...

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swalamban Yojana: 2.5 lakhs for new well, response from farmers in Sangli is low | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना: नवीन विहिरीसाठी अडीच लाख, सांगलीतील शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना: नवीन विहिरीसाठी अडीच लाख, सांगलीतील शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी

सांगली : नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्याबरोबरच राज्याचा आर्थिक कणा असलेला बळीराजा अधिक सक्षम होण्यासाठी राज्यशासन विविध योजना राबवत असते. राज्य शासनाच्या अशा योजनांपैकीच शेतकऱ्यांना स्वावलंबी घडविण्यासाठी अस्तित्वात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेकडे पाहिले जात आहे. या योजनेतून विहीर दुरुस्तीसाठी जिल्ह्यातून १५ शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले आहेत. या योजनेसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूपच कमी आहे.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आर्थिक मदत स्वरूपात शेतात विहीर बांधण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. त्यांना त्यांच्या शेतात जास्तीत जास्त उत्पन्न घेता यावे. तसेच या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे.

काय आहे कृषी स्वालंबन योजना?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महाराष्ट्र राज्य सरकारने २०२४ मध्ये सुरू केली आहे. या योजनेची अधिकृत सुरुवात जानेवारी २०२४ मध्ये करण्यात आली होती. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य, तांत्रिक प्रशिक्षण आणि जल व्यवस्थापनाच्या साधनांची उपलब्धता करून देणे आहे. हे महाराष्ट्र राज्य सरकारचे एक महत्त्वपूर्ण कृषी विकास अभियान आहे. या योजनेचा उद्देश शेती क्षेत्रातील विकास साधणे आहे.

कोणाला घेता येतो लाभ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकरी घेऊ शकतात.

कशासाठी किती पैसे मिळतात?

नवीन विहिरीसाठी अडीच लाख : नवीन विहीर प्रति लाभार्थी देय उच्चतम अनुदान मर्यादा दोन लाख ५० हजार रुपये आहे.
विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार : जुनी विहीर दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त ५० हजार रुपये शासनाकडून अनुदान मिळत आहे.
शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी लाखाचे अनुदान : शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण जास्तीत जास्त अनुदान मर्यादा एक लाख रुपयांपर्यंतची आहे.

अर्ज कसा कराल?

या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे कृषी विभागाशी संपर्क साधावा.

१५ जणांचे अर्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकरी लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत. -मनोजकुमार वेताळ, कृषी विकास अधिकारी.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swalamban Yojana: 2.5 lakhs for new well, response from farmers in Sangli is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.