नियोजित शिवभोजन केंद्राची डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:09 PM2020-01-21T12:09:29+5:302020-01-21T12:13:28+5:30
सांगली जिल्ह्यामध्ये शिवभोजनालय सुरू करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पहाणी केली.
सांगली :सांगली जिल्ह्यामध्ये शिवभोजनालय सुरू करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पहाणी केली.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे उपस्थित होत्या. यामध्ये सांगली बस्थ स्थानक परिसर, मार्केट यार्ड आणि सिव्हील हॉस्पीटल परिसर यांचा समावेश आहे.
शिवभोजन केंद्रांची सुरूवात 26 जानेवारी रोजी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार असून ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहाणार आहेत. या भोजनालयांमध्ये बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल.
शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात सक्त मनाई असेल. कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरविण्यात येणार नाही याची जबाबदारी संबंधित संस्था चालकाने घ्यावयाची आहे.
सदर थाळीची किंमत शहरी भागात 50 रूपये राहाणार असून ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रूपये एवढ्या रक्कमेव्यतिरीक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून संबंधितांना शासनामार्फत वितरीत करण्यात येणार आहे. शिवभोजनालयातील लाभार्थी नोंदविण्यासाठी शासनाकडून दिलेल्या ॲपचा वापर करणे आवश्यक आहे.