कलारसिकांकडून रंगरेषांची सफर
By admin | Published: June 21, 2016 11:15 PM2016-06-21T23:15:54+5:302016-06-22T00:11:40+5:30
‘कलाविश्व’चा उपक्रम : विलास टोणपेंच्या कलेचा आस्वाद
सांगली : उत्साहाचा कॅन्व्हास...त्यावर कुंचल्यातून होणारी रंगांची बरसात... हळूहळू जिवंत होऊन रसिकांशी संवाद साधणारे चित्र अशा वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार प्रा. विलास टोणपे यांनी कलाप्रेमी रसिक यांना रंगरेषांची अनोखी सफर घडवून आणली. सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयाच्यावतीने शांतिनिकेतन परिसरात ‘व्यक्तिचित्रांचे रेखाटन व मार्गदर्शन’ याविषयी कार्यशाळा पार पडली. टोणपे यांच्या या कार्यशाळेविषयी कमालीची उत्सुकता कलाकार, रसिकांमध्ये होती. त्यामुळे सांगलीसह इचलकरंजी, कोल्हापूर, इस्लामपूर, कुपवाड येथील कला महविद्यालयातील विद्यार्थी व चित्ररसिकांनी कार्यशाळेस मोठी गर्दी केली होती. मूळचे मराठी भाषिक असलेले परंतु मागील बावीस वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास असलेले टोणपे यांनी माईक हातात घेऊन ‘नमस्कार’ असे म्हटल्यानंतर टाळ््यांचा कडकडाट झाला. मराठीतील संवादाला मिळालेली ही दाद पाहून टोणपे यांनी मराठीतूनच कार्यशाळा घेतली. अवघ्या दोन तासात त्यांनी सांगलीतील प्रसिध्द वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांचे व्यक्तीचित्र हॅण्डमेड कागदावर पेन्सील आणि चारकोलच्या माध्यमातून साकारले. व्यक्तिचित्रांचे महत्त्व, प्रकाशरचना, रंगसंगती, रेखाटनातील बारकावे त्यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी टोणपे म्हणाले, भारतीय संस्कृतीत ज्ञानदानाला महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञान ही विकण्याची वस्तू नाही, तर आपल्याकडील ज्ञान दुसऱ्यास विनामूल्य उपलब्ध करुन देणे या संकल्पनेचा आपण स्वीकार केला आहे.
यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील, प्राचार्य बाळासाहेब पाटील, सत्यजित वरेकर, महेश पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र माझ्या हृदयात
‘कित्येक वर्षे परदेशात असलो तरी मला मराठीचा अभिमान आहे. माझे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य असले तरीही महाराष्ट्र कायम माझ्या हृदयातच आहे’ असे टोणपे यांनी सांगितल्यावर त्याला दाद मिळाली.